Pimpri: महापालिका प्रशासकीय कामकाजासाठी नवीन इमारत बांधणार; 250 कोटी खर्च अपेक्षित, वास्तूविशारदाची नेमणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी महिंद्रा कंपनीच्या जवळील आरक्षित भूखंडावर नवीन पाच मजली इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 250 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी लॅडमार्क डिझाईन ग्रुप यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक केली आहे. त्यांना निविदा रकमेच्या 1.90 टक्के रक्कम देण्यास स्थायी समितीने आज (गुरुवारी) झालेल्या महासभेत आयत्यावेळी मान्यता दिली.

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवरील 25 आणि आयत्यावेळचे 15 असे एकूण 59 कोटी 87 लाख रुपयांच्या 39 विषयांना मान्यता देण्यात आली. तर, तीन विषय तहकूब तर दोन विषय दफ्तरी दाखल करण्यात आले.

पुणे-मुंबई महामार्गवरील पिंपरीत महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. या चार मजली इमारतीचे 13 मार्च 1987 रोजी उद्घाटन झाले होते. त्यानंतर सातत्याने महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले. तीन मजल्यावर अधिका-यांची दालने तर, तीस-या मजल्यावर पदाधिका-यांची दालने आहेत. कार्यालये आणि दालनांसाठी जागा अपुरी पडत आहे. क्रीडा आणि स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) विभागाचे कार्यालय मुख्यालयातून महापालिकेच्या इतर इमारतीमध्ये स्थलांतरित केले आहे. मुख्यालयातील अनेक अधिका-यांची दालने लहान आहेत.

वर्दळ असलेल्या नगररचना आणि बांधकाम विभागासाठी जागा कमी आहे. नागरिकांना बसण्यासाठी जागा अपुरी पडते. शहरातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेतर्फे पाणीपुरवठा व जलनिःसारण समिती गठीत केली जाणार आहे. समितीच्या सभापतींसाठी दालन निर्माण करावे लागणार आहे. महापालिकेचा नोकर भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. नोकर भरतीला मान्यता मिळाल्यास आणि कर्मचारी भरत्यानंतर पुन्हा जागेची कमरता भासणार आहे.

महापालिकेत वाहनतळ देखील पुरेसे नाही. अधिकारी, नगरसेवकांची वाहनेच पार्क करण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे नागरिक पुणे-मुंबई महामार्गावर वाहने पार्क करतात. महापालिका कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोग लागू झाला आहे. कर्मचा-यांचा पगार वाढल्याने चारचाकी वाहनांची संख्या देखील वाढू शकते. त्यामुळे वाहनतळाला जागा अपुरी पडणार आहे. त्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता आहे.

महापालिका मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनीच्या जवळील आरक्षित भुखंडावर नवीन पाच मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील अनुषंगिक कामे करण्यासाठी वास्तुविशारद नेमून निविदा काढण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 8 जुलै 2019 रोजी मान्यता दिली आहे. कामाचे नकाशे तयार करुन त्यास बांधकाम परवानगी घेणे, कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, आरसीसी डिझाईन करणे, सविस्तर नकाशे तयार करणे, बांधकाम परवानगी विभागाकडून कामास पुर्णत्वाचा दाखला प्राप्त करुण घेणे. नकाशाप्रमाणे काम करुन घेण्यासाठी लॅडमार्क डिझाईन ग्रुप यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना निविदा रकमेच्या निविदा पुर्व कामासाठी 0.50 टक्के आणि 1.40 टक्के निविदा पश्चात कामासाठी अशी एकूण 1.90 टक्के रक्कम देण्यात येणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.