Pimpri News: आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पालिकेची अग्निशमन सेवा तत्पर

एमपीसी न्यूज –  पिंपरी – चिंचवड महापालिकेची अग्निशमन सेवा आग आणि इतर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तत्पर आणि सुसज्ज आहे. कोणतीही जीवीत आणि वित्त हानी टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी स्वतःहून योग्य ती खबरदारी घेतल्यास संभाव्य धोका टळू शकतो, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

शहरात निवासी, मिश्र आणि बिगर निवासी उत्तुंग इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये गंभीर प्रकारच्या दुर्घटना होऊ नये. यासाठी अग्निशमन विभागाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्तीशी सामना करणाऱ्या यंत्रणा सक्षम करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. काळाशी सुसंगत ठरेल, असे व्यवस्थापन करण्यासाठी नागरी सहभागावर भर देण्यात येत आहे.

महापालिका मुख्य इमारत, प्रभाग कार्यालये,  दवाखाने,  रुग्णालये,  प्रेक्षागृहे, शाळा तसेच उंच निवासी गृह निर्माण संस्था  अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक जीने आहेत किंवा रेफ्युज एरिया, लॉबी आणि पॅसेज आहेत अशा इमारतींमधील सर्व जीने रेफ्युज एरिया, लॉबी आणि पॅसेज हे विनाअडथळा संपूर्ण मोकळे ठेवणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ, टाकाऊ साहित्य यांची साठवणूक करू नये. सदर परिसर आग तसेच अन्य दुर्घटनेसमयी आपत्कालीन वापराकरिता सुस्थितीत आणि संपूर्ण मोकळा ठेवावा.  इमारतीमध्ये आग दुर्घटना घडू नये  अथवा त्यामध्ये जीवीत हानी किंवा वित्त हानी होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी काटेकोरपणे दक्षता घेणे गरजेचे आहे.

दुर्घटना होऊ नये यासाठी दक्षता घेणे महत्वाची आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या इमारती, उंच निवासी गृह निर्माण संस्था, व्यावसायिक व मिश्र इमारती याठिकाणी अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणा-या उपाययोजना करून त्या कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे, असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.