Pimpri News: आसाम निवडणूक प्रचारात शहर युवक काँग्रेस सहभागी

एमपीसी न्यूज – आसाम राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे यांच्या मार्गदर्शानाखाली युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची टीम आसाम मध्ये 22 मार्च पासून कार्यरत झाली आहे.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांची तसेच मावळातील तळेगाव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाळुंज व शरद कदम यांची आसाम राज्यातील विधानसभा निवडणूक निरिक्षक पदावर निवड करण्यात आली आहे.

आसाम राज्यातील ग्वालपाडा व ठूबरी या जिल्ह्यातील ग्वालपाडा पूर्व, ग्वालपाडा पश्चिम, दूधनोई, जलेश्वर, साऊथ सालामारा व गोलकगंज या सहा विधानसभा मतदारसंघात हे कार्यकर्ते प्रचारात आघाडी संघटनाची यंत्रणा, प्रत्यक्ष नागरी बैठका, बूथ व्यवस्थापन, सामाजिक समन्वय तसेच शहरी व ग्रामीण मतदारांशी समन्वय साधण्याचे काम करत आहेत.

याबाबत सविस्तर माहीती देताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले, “आसाम राज्यात यंदा परिवर्तन अटळ आहे, काँग्रेस सोबत एआययुडीएफ, सीपीएम, सीपीआय, बीपीएफ, या महाआघाडीकडून सत्ता परिवर्तनाचा संकल्प करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा नागरी प्रश्नावर अत्यंत परिणामकारक पणे तयार केला गेला असून यात पाच कलमी कार्यक्रम ठरविण्यात आला आहे या द्वारे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, महिलांना 2 हजार रुपयाचा मासिक निधी योजना, 200 युनिट पर्यंतची घरगुती मोफत वीज, चहा बागांतील कामगारांना 365 रुपयांचे दैनिक वेतन व सुमारे 5 लक्ष रोजगार सरकारी क्षेत्रात देण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.

या जाहीरनाम्याला व काँग्रेस प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच मागील वर्षीच्या भाजपा सरकारकडून झालेली फसवणूक ,वाढती महागाई व सीएए कायदा याबाबत नागरिकांचा मोठा रोष आहे व या सर्वां मुळे सत्ता परिवर्तनाची खात्री निर्माण झाल्याने दिसून येत आहे, असे बनसोडे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.