Pimpri News: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी शहरात; महापालिकेच्या विविध विकासकामांची उद्घाटने, भूमीपूजन

एनपीसी न्यूज – राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या (रविवारी) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात विकसित झालेल्या कामांचे उद्घाटन आणि नवीन कामांचे भूमीपूजन दुपारी दोन वाजल्यापासून फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.  

प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत. तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे असणार आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपणार आहे. कार्यकाळ संपण्यास आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विकासकामांची उद्घाटने, भूमीपूजनाचा धडाका सुरु आहे.

विविध विकासकामांची उद्घाटने, भूमीपूजनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी शहरात येणार आहेत. दुपारी दोन वाजल्यापासून उद्घाटनाला सुरुवात होईल. दुपारी दोन वाजता पिंपळेनिलख येथील बाणेर पुलाजवळील नव्याने विकसित झालेले शहीद अशोक कामठे उद्यानाचे उद्घाटन, अडीच वाजता ग क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, तीन वाजता प्रभाग क्रमांक 24 सेक्टर नंबर 22 थेरगाव येथील खेळाच्या मैदानाचे उद्घाटन, सव्वातीन ते पावणे चारच्या दरम्यान मोरवाडीतील नवीन विरंगुळा केंद्र, अण्णासाहेब पाटील स्मारक उद्घाटन व प्रभाग क्रमांक दहा येथील शिवशाहुशंभो उद्यान, राजर्षी शाहु महाराज क्रीडांगण व व्यायामशाळेचे नामकरण (एकाच जागेवरुन), बर्ड व्हॅली म्युझिकल फाऊंटनचे उद्घाटन केले जाणार आहे.

सव्वाचार वाजता पूर्णानगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे लोकार्पण, सेक्टर क्रमांक चार साईनाथ हॉस्पिटल शेजारील उद्यान व सेक्टर क्रमांक तीन स्केटींग ग्राऊंड समोरील उद्यानाचे उद्घाटन, सायंकाळी पाच वाजता भोसरीतील कुस्ती केंद्राचे उद्घाटन आणि सायंकाळी साडेपाच वाजता बोपखेल येथील बहुउद्देशीय इमारतीचे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.