Pimpri News: महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान स्वीकारावे- सचिन साठे

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना मागील अडीच वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आवश्यक तेवढा पाण्याचा साठा पवना धरणात शिल्लक असतानाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना पाणी पुरवठा विषयाबाबत वेठीस धरले जात असल्याचा आरोप करत प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतःच्या कार्यकालात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान स्वीकारावे,  अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारण नसतानाही शहरातील नागरिकांना दिवसाआड, एकवेळ पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. यानंतर आलेल्या आयुक्त राजेश पाटील यांनी रोज पाणीपुरवठा करू असे आश्‍वासन अनेक वेळा महापालिका सर्वसाधारण सभेत आणि वेळोवेळी माध्यमांसमोर दिले आहे. आंद्रा आणि भामा आसखेड पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही पाटील यांनी वेळोवेळी सांगितले आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध व पूर्णवेळ पाणी देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. नागरिकांनी या विषयावर सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलने केली आहेत. पिंपळे निलख, विशालनगर परिसरातील नागरिकांनी 1 मे 2022 (महाराष्ट्र दिन) पासून दहा हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन आयुक्तांना देणेबाबत अभियान राबवले होते. या अभियानात आजपर्यंत दहा हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तयार झाले असून हे निवेदन आयुक्तांना साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

पिंपरी – चिंचवड महापालिका इतर अनावश्यक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करते. परंतु, पाणी पुरवठा हा नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असताना देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. आयुक्त राजेश पाटील यांची उत्तम, कुशल प्रशासक म्हणून प्रतिमा असून त्यांनी हा शहरातील 28 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न ताबडतोब सोडवण्याचे आव्हान स्विकारावे आणि आपली कार्यकुशलता व क्षमता सिद्ध करावी, अशीही मागणी साठे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.