Pimpri News: महासभांमध्ये मूग गिळून गप्प बसलेल्या विरोधकांना जनतेची महासभा घेण्याचा अधिकार नाही – नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – आगामी निवडणुकीनंतर महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याची चाहूल लागल्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेना हे पक्ष भाजपवर खोटेनाटे आरोप करुन भ्रष्टाचार झाला असा  “ साप साप म्हणून भुई थोपटण्याचा ” केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. मुळात आम्ही शहरात 2017 पासून विविध विकास कामे केलेली आहेत. 5 वर्षात झालेल्या महासभांमध्ये विरोधक मूग गिळून गप्प बसले  आणी आता 9 विषय घेवून न झालेल्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा त्यांना कसलाही नैतिक अधिकार नाही, अशी टीका सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली.

ढाके म्हणाले, शहरातील जनतेने गेल्या 15 ते 20 वर्षापासून राष्ट्रवादीने महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून  2017 मध्ये झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या हाती सत्ता सोपवली. या पाच वर्षाच्या काळामध्ये भाजपाने शहरातील गरजा ओळखून पुढील 30 वर्षाचे नियोजन करुन विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. आता राष्ट्रवादीकडे नागरिकांसमोर जाण्यासाठी कसलेही ठोस मुद्दे नसल्यामुळे येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भ्रष्टाचाराचा कसलाही पुरावा नसताना नाहक खोटे नाटे आरोप करुन शहरातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वास्तविक महापालिकेमध्ये स्मार्ट सिटी, स्थायी समिती किंवा सर्वच विषय समित्यांमध्ये आमच्याबरोबर राष्ट्रवादीसह शिवसेनेचे सुध्दा त्याप्रमाणात सदस्य आहेत. विकास कामांचे विषय संबधित सभेमध्ये पटलावर असताना या मंडळीनी गेल्या 5 वर्षात कोणत्याही सभेमध्ये त्यांचा आक्षेप नोंदविलेला नाही. यांना भ्रष्टाचार झाला असे वाटतच होते. तर, त्यावेळेसच तो रोखता का आला नाही आणि आता कुठला एकही पुरावा नसताना अचानक भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार कसा होतो हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही. सभेमध्ये मंजुर झालेल्या विषयांचा पुरावा कोणाला बघायचाच असेल तर प्रत्येक सभेचा सभावृत्तांत महापालिकेमध्ये उपलब्ध आहे.

महापालिकेमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून राष्ट्रवादीने जोपासलेले जे ठेकेदार आहेत. तेच ठेकेदार आत्तासुध्दा महापालिकेमध्ये काम करत आहेत. ज्या ठेकेदारांनी एफडीआरच्या बाबतीत घोटाळे केले ते विरोधकांचेच बगलबच्चे आहेत. या 5 वर्षाच्या काळामध्ये भाजपाने या ठेकेदारांना नियमानुसार काम करण्यासाठी भाग पाडल्यामुळे राष्ट्रवादीची दुकानदारी पूर्ण बंद पडली आहे. याचा रोष आता हे भाजपावर काढत आहेत.  खरंतर सद्या राज्यामध्ये यांचीच महाविकास आघाडीची सत्ता आहे. यांच्याकडे जर भ्रष्टाचाराचे पुरावे होते. तर वेळीच त्याबाबत चौकशी का लावली नाही किंवा न्यायालयीन कारवाई का करावीशी वाटली नाही. शिवाय ज्यांनी ज्यांनी गेल्या 20 ते 25 वर्षात महापालिकेला स्वत:ची जहागीरी समजून महापालिकेच्या वास्तुंमध्ये आपली दुकाने थाटली आहेत. त्याचाही लवकरच पर्दाफाश करु असा पलटवार  ढाके यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.