Pimpri News: पुरस्कार मिळाले की वाटचाल योग्य सुरु असल्याचे बळ मिळते – ​पंडित ​विजय घाटे

एमपीसी न्यूज : नशिबाची साथ ही माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाची आहे. त्याची सुरुवात आई-वडिलांपासून होते. तसेच गुरु पण महत्वाचे असतात. या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. पुरस्कार मिळाले की आपली वाटचाल योग्य सुरु आहे, हे बळ मिळते, अशा मोजक्या पण आशयसंपन्न शब्दात पद्मश्री पं. विजय घाटे यांनी स्वरसागर पुरस्कार स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाला आज (शुक्रवारी) सुरुवात झाली. त्यावेळी सतरावा स्वरसागर पुरस्कार विख्यात तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांना पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी संतूरवादक राहुल शर्मा, ज्येष्ठ गायक सुधाकर चव्हाण, तबला वादक आदित्य कल्याणपूरकर, आयोजक प्रवीण तुपे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मानपत्र, रोख एकावन्न हजार रुपये, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

याच वेळी यंदाचा ज्येष्ठ गायक पंडित पद्माकर कुलकर्णी युवा कलाकार पुरस्कार युवा गायिका शाश्वती चव्हाण हिला प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ कलाकार तेजश्री अडिगे यांनी गणेश वंदना सादर केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी केले. आभार प्रशांत पाटील यांनी मानले. मानपत्राचे वाचन प्रतिमा दातार यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा कुलकर्णी व श्रेयस आवटे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.