Pimpri News : पिंपरीतील वाहतूक कोंडीवर उपाय काढा ; आमदार, नगरसेवकांकडून शगुन चौकाची पाहणी  

एमपीसी न्यूज – इंदिरा गांधी पुलावरुन शगुन चौकाकडे जाणारा मार्ग पुलाच्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी मुख्य बाजार, रिव्हर रोड, भाट नगर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार, नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त व व्यापा-यांनी शगुन चौकाची आज (दि.22) पाहणी केली. पिंपरीतील वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय काढा अशी मागणी यावेळी व्यापारी वर्गाने केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=CwSa6lA-gRY
यावेळी पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक डब्बु आसवाणी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, रोमी संधु, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी व्यापारी प्रतिनिधी आणि इतर नागरिक उपस्थित होते.
इंदिरा गांधी पुलाची जवळपास एक वर्षापासून डागडुजी सुरू आहे. सुरुवातीला मोरवाडी कडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला, त्यानंतर आंबेडकर चौकाकडे जाणारा मार्ग आणि हे दोन्ही मार्ग खुले केल्यानंतर आता शगुन चौकाकडे जाणारा मार्ग पुलाच्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी हा मार्ग बंद करण्यात आला. पण, हा मार्ग बंद करण्यापूर्वी पालिका अथवा वाहतूक विभागाकडून कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नाही. अचानक मार्ग बंद केल्याने पिंपरीतील सर्वच रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

पिंपरी मुख्य बाजार, रिव्हर रोड, भाट नगर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक नियोजनाचा यामुळे फज्जा उडाला आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अर्धा ते एक तास एवढा वेळ लागत आहे. व्यापारी वर्ग, छोटे मोठे दुकानदार यामुळे त्रस्त झाले आहेत. याचा आमदार अण्णा बनसोडे यांनी यावेळी आढावा घेतला.
याबाबत माहिती देताना नगरसेवक डब्बु आसवाणी म्हणाले, ‘पिंपरी मधील वाहतूक कोंडीची समस्या जुनी आहे. हा मार्ग बंद करण्यापूर्वी पालिका अथवा वाहतूक विभागाने कोणतीही पूर्व सूचना दिली नाही. अचानक मार्ग बंद केल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.’
‘मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणे आहेत, रस्त्यावर हातगाड्या, फेरीवाले यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. यामुळे पिंपरीतील वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय काढण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे,’ असे आसवाणी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.