Pimpri News: मनुष्यबळाची कमतरता, YCMH मधील अतिदक्षता विभागाचे कामकाज ‘रूबी अलकेअर’कडे

रूग्णालयातील दोन्ही अतिदक्षता विभाग रूबी अलकेअर सर्व्हिसेस यांना चालविण्यास देण्यात आले आहेत. त्यासाठी दोन कोटी रूपये खर्च होणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील अतिदक्षता विभागात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे रूग्णालयातील दोन्ही अतिदक्षता विभाग रूबी अलकेअर सर्व्हिसेस यांना चालविण्यास देण्यात आले आहेत. त्यासाठी दोन कोटी रूपये खर्च होणार आहे.

शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा 31 हजारपार गेला आहे. दररोज कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पालिकेमार्फत विविध कोरोना वॉर्ड आणि कोरोना केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय हे कोरोना रूग्णांवरील उपचाराकरिता समर्पित करण्यात आले आहे.

पालिका रूग्णालयांमध्ये सध्या मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या रूग्णालयांमधील अतिदक्षता विभाग (आयसीयू) चालविण्यास त्यामुळे अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका रूग्णालयांमधील आयसीयू बेड खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला.

निविदा प्रक्रिया राबवून इच्छूक संस्थाकडून दरही मागविण्यात आले. रूबी अलकेअर सर्व्हिसेस यांनी वायसीएम रूग्णालयातील 15 बेडसाठी 11 हजार 999 रूपये असे दर सादर केले. त्यानंतर 7 हजार 500 रूपये प्रतिबेड-प्रतिदिन असा सुधारीत दर सादर केला.

याच दरात रूबी अलकेअर यांनी वायसीएम रूग्णालयातील दोन अतिदक्षता विभागातील 30 बेडचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. हे दर स्वीकृत करण्यास आयुक्तांनी 1 ऑगस्ट रोजी मान्यता दिली आहे. तातडीची बाब लक्षात घेऊन रूबी अलकेअर यांना प्राप्त मंजूर दराने कामाचा आदेश देण्यात आला आहे.

त्यासाठी 2 कोटी 2 लाख 50 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तीन महिने अथवा कोरोना साथीचा प्रादूर्भाव विचारात घेऊन रूबी अलकेअर यांच्यासमवेत कार्योत्तर करारनामा करण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.12) मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.