Pimpri : पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या बेकायदेशीर कामकाजावर औद्योगिक न्यायालयाने घातले निर्बंध

अंबरनाथ चिंचवडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ मनमानी आणि बेकायदेशीर कामकाज करत आहे. महासंघाच्या या बेकायदेशीर कामकाजाला औद्योगिक न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. पुढील आदेश निर्गत होईपर्यंत संघटनेच्या पदाधिका-यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा, कार्यकारी मंडळाची सभा तसेच बॅंक ऑफ बडोदा बॅंकेत कुठलेही आर्थिक व्यवहार करु नये, यावर प्रतिंबध घालण्यात आला आहे, अशी माहिती अंबरनाथ चिंचवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मधुकर रणपिसे, विलास नखाते, नारायण वाघेरे, दिलीप काटे, संदेश नढे, संभाजी काटे, गणेश लाडे, हेमंत जाधव, योगेश रसाळ, गणेश भोसले, मिलीद काटे आदी उपस्थित होते.

  • याबाबत चिंचवडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी महापालिका कामगारांच्या हिताचे काम न करता स्वःहिताचे कामकाज करत आहेत. पेमेंट ऑफ वेजेस अॅक्टनूसार सर्व सेवकांच्या वेतनातून सभासद वर्गणी प्रतिमहा कपात करुन घेतली जाते. सभासदांच्या बोनसमधून 2 टक्के रक्कम महासंघ वर्गणी म्हणून जमा होत आहे. महापालिकेतील पदाधिका-यासह सर्वांनीच एकमताने महासंघाला पाठबळ दिले आहे.

महासंघाचे अध्यक्ष व पदाधिकारी हे मनमानी कारभार करीत आहेत. महासंघाची नोंदणी ज्या घटनेनुसार झाली. त्या घटनेत पदाधिका-यांची संख्या निश्चित केलेली आहे. तसेच औद्योगिक न्यायालयाची मान्यता मिळवण्यासाठी हीच घटना सादर केलेली आहे. मात्र, गेल्या काही वर्षात निवडणुकीद्वारे पदाधिकारी निवडून देणे आवश्यक असतानाही महासंघ निवडणुका घेत नाही. केवळ कागदोपत्रीच पुर्तता केल्याचे दाखवून स्वताः अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून मनमानी पध्दतीने कामकाज सुरु आहे.

  • तसेच महासंघाच्या काही चुकीच्या कामांना विरोध केल्यामुळे मला संघटनेच्या खजिनदार पदावरून नियमबाह्यपणे काढून टाकण्यात आले. घटनेत अस्तित्वात नसलेल्या कार्याध्यक्ष पदावर माझी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत अतिरिक्त कामगार आयुक्त पुणे यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह लेखी तक्रार केली. अतिरिक्त कामगार आयुक्तांनी सुनावणी घेऊन महासंघाच्या बेकायदेशीर कारभाराची खात्री करुन, हे प्रकरण औद्योगिक न्यायालय पुणे यांच्याकडे दावा दाखल करण्यास समंती दिली.

औद्योगिक न्यायालयाने महासंघाचे बेकायदेशीर कामकाज पाहून तात्काळ पुढील आदेश निर्गत होईपर्यंत महासंघाच्या अध्यक्ष आणि पदाधिका-यांवर वार्षिक सर्वसाधारण सभा, कार्यकारी मंडळाची सभा घेणेस प्रतिबंध घातले. तसेच गेल्या कित्येक वर्षापासून पदाधिका-यांनी केलेला बेकायदेशीर आर्थिक व्यवहार पाहता, त्यावर निर्बंध घालून महासंघाचे बॅंक ऑफ बडोदा, पिंपरी, महानगरपालिका एक्स्टेन्शन काऊंटर येथील बचत खात्यामधील कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचा-यांच्या पैशाचा गैरवापर टाळावा, म्हणून औद्योगिक न्यायालयाने कर्मचारी महासंघाच्या अध्यक्ष आणि पदाधिका-यांच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराला चपराक दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

  • कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे म्हणाले, “महासंघाचे कामकाज नियमानुसार सुरु आहे. महापालिका हद्दीत पूर्वी चार प्रभाग होते. त्या प्रभागांमध्ये वाढ होऊन त्याचे आठ प्रभाग झाले आहेत. त्यामुळे महासंघाच्या पदांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. पदांमध्ये वाढ केल्यानंतर महासंघाच्या घटनेत बदल करून त्याला मान्यता घेण्यात येते. त्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. महासंघाने आजवर कोणतेही चुकीचे काम केले नाही. यापुढे देखील चुकीचे काम होणार नाही.

महासंघाच्या कामगार भावनांचे काम सुरु आहे. त्या कामामध्ये अंबरनाथ चिंचवडे यांना अडसर निर्माण करायचा आहे. त्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप करीत आहेत. न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचा सर्वजण मान ठेवतील. महासंघाच्या वतीने न्यायालयात दुसरी बाजू मांडण्यात येईल. त्यानंतर न्यायालय अंतिम निर्णय देईल. अंबरनाथ चिंचवडे मागील आठ वर्षांपासून महासंघाच्या खजिनदार पदावर कार्यरत आहेत.

  • दरवर्षी महासंघाची सर्वसाधारण सभा होते. यावेळी सर्व पदाधिका-यांचे राजीनामे घेतले जातात. सभेमध्ये सर्वांच्या संमतीने पुढील वर्षीसाठी कार्यकारणी तयार केली जाते. यावर्षी चिंचवडे यांना सर्वसंमतीने खजिनदार पदावरून काढण्यात आले आहे. त्यामुळे ते अशा प्रकारचे आरोप करीत आहेत, असेही झिंजुर्डे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.