Pimpri: विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना राजीनामा देण्याचे आदेश

अजितदादांचा शहराध्यक्षांना फोन; नवीन विरोधी पक्षनेता कोण?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना फोन करुन साने यांना राजीनामा देण्यास सांगण्याचे पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, नाना काटे, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयुर कलाटे हे इच्छुक असून त्यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. आपण निष्ठावान असून पक्षाचा आदेश आपल्याला मान्य असल्याचे साने यांनी सांगितले.

अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्यावर्षी विरोधी पक्षनेते झालेले योगेश बहल यांचा वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर राजीनामा घेतला होता. बहल यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखलीतील ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची 17 मे 2018 रोजी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली होती. पक्षाच्या अलिखित ठरलेल्या नियमानुसार साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ 17 मे 2019 रोजी संपुष्टात आला आहे.

  • त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी नवीन नगरसेवकाला संधी देण्यासाठी साने यांचा राजीनामा घेण्यास सांगितले आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना फोन करुन साने यांना राजीनामा देण्याला सांगावे, अशी सूचना केली आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी. यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. दत्ता साने यांचा एक वर्षांचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे नवीन नगरसेवकाला संधी देण्यासाठी साने यांना राजीनामा देण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. त्यांचा आज फोन आला होता. साने यांना याबाबत सांगितले असून ते विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील”.

  • दरम्यान, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेकांना पाच-पाच वर्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक चेह-याला बदलणे राष्ट्रवादीला अवघड जाईल. परिणामी, भाजपच्या कुटनितीचा विजय होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

‘हे’ आहेत विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छूक!
विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, नाना काटे, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयुर कलाटे हे इच्छूक आहेत. पहिल्यावर्षी पिंपरी आणि दुस-यावर्षी भोसरी मतदारसंघातील नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिस-यावेळी कोणत्या मतदारसंघात विरोधी पक्षनेतेपद दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.