Pimpri : पिंपरी पेंढार येथे सन 1983-84 बॅचची तब्बल 40 वर्षांनंतर भरली शाळा

एमपीसी न्यूज : पिंपरी पेंढार (Pimpri) येथील श्री सद्गुरू सीताराम महाराज विद्यालयातील सन 1983-84 बॅचच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा विद्यालयातील ज्या वर्गात शिकले त्याच वर्गात पुन्हा एकदा 40 वर्षांनंतर भरवण्यात आला.
यावेळी वर्गाबाहेर विद्यार्थिनींनी सुंदर रांगोळी रेखाटली. सर्व गुरुजनांना व विद्यार्थ्यांना फेटे बांधून सर्वांचे स्वागत करण्यात आले. वर्ग भरल्यानंतर शिक्षकांचे वर्गात आगमन झाल्यावर गुरुजनांवर फुलांचा वर्षांव करून गुरुजनांचे अनोखे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ आहेर सरांची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सरदार नवले, बाजीराव चौगुले सर, एकनाथ आहेर , बळवंत ठुबे , गणपत शिंदे आणि विश्वनाथ आहेर या गुरुजनांना शाल, गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या 1983-84 बॅचच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी पेंढार सोशल युथ फाऊंडेशनचा सत्कार शाल, गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत वक्त केले. तेव्हा गुरुजनांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी क्रीडा शिक्षक सरदार पांडुरंग नवले सर आपल्या मनोगतात म्हणाले, तुमच्या बॅचने कबड्डीमध्ये शाळेचे नाव कमावले म्हणून तुमच्यामुळे माझा सन्मान वाढला. असे विद्यार्थी घडवू शकलो याचा अभिमान आहे.
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा उन्माद; मार्शने विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेऊन काढला फोटो
चित्रकला शिक्षक एकनाथ आहेर सर मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय जे बी मोमीन सरांच्या आठवणीने गहिवरले. अध्यक्षस्थानी असलेले विश्वनाथ आहेर सरांनी ते या शाळेत असतानाचे अनेक किस्से सांगितले. त्याचबरोबर या प्रगतशील गावाबरोबर विशेष नाळ जोडली गेली असल्यामुळेच आम्ही या गावात आमच्या घरातील चार मुली दिल्या असल्याचे आवर्जून सांगितले.
हल्लीच्या घाणेरडया राजकारणावरही भाष्य केले. हल्लीच्या राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे व बदल घडवावा असेही मत त्यांनी व्यक्त केले. या स्नेहमेळाव्यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी 40 वर्षापूर्वीच्या काळातील अनेक किस्से सांगितले. तेव्हा वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमानंतर सर्वानी मासवडी व भाकरी या स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी विद्यार्थी नंदकिशोर कुटे यांनी केले तर आभार उद्योजक सतीश नवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या बॅचचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.