Pimpri : पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारकात उद्या महिला शिक्षण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ( Pimpri) जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2024 रोजी पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे “महिला शिक्षण दिन” साजरा करण्याच्या अनुषंगाने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असून विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार व कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते बुधवारी सकाळी 11 वाजता पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.  त्यानंतर भवनातील तळमजल्यावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रकार सोमनाथ भोंगळे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मोशी येथील महापालिकेच्या शाळेमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

Talegaon Dabhade : वडगाव फाटा चौकात उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित विचार प्रबोधन पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी उत्कृष्ट महिला बचत गटांचा सत्कार आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर   “मी तुमची सावित्रीबाई फुले” हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग सुप्रसिद्ध कलाकार मेघना झुझम या सादर करणार आहेत.

दुपारच्या सत्रात  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित “सावित्रीच्या ज्योती” हा संगीत, नाट्य, नृत्य आणि गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुप्रसिद्ध कलाकार रितेश नगराळे सादर करणार आहेत. दुपारी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील विविध भागातील निमंत्रित कवी आपल्या कविता या कार्यक्रमात सादर करणार आहेत.

तर, सायंकाळी 5 वाजता “सावित्रीच्या लेकी” या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्या ऍड. मनिषा महाजन, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. मनिषा गवळी, प्रा. डॉ. माधवी खरात, पत्रकार अश्विनी सातव डोके तसेच सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे यांचा सहभाग असणार आहे.

त्यानंतर सायंकाळी 7.00 वाजता निर्मिक आर्टस प्रस्तुत ‘’जागर समतेचा’’ या सांस्कृतिक प्रबोधनात्मक शाहिरी जलसेच्या कार्यक्रमाद्वारे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे. यामध्ये धम्मरक्षित रणदिवे आणि त्यांचे सहकारी सहभागी होणार आहेत. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले ( Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.