Pune News : पितृऋण’ उपक्रमाअंतर्गत रंगली संवादात्मक मैफल

एमपीसी न्यूज : गानतपस्वीनी मोगुबाई कुर्डिकर, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे यांच्यासह अनेक ख्यातकीर्त गायकांच्या गायकीतील तसेच उत्तर भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील विविध घरण्यांमधील सौंदर्यस्थळे प्रसिद्ध गायक पंडित सत्यशील देशपांडे यांनी ‘शब्द-गान’ या सांगीतिक मैफलीतून आज उलगडून दाखविली. (Pune News) रागसंगीत हे शब्दप्रधान नसून त्यात गायकाचे भावविश्व महत्त्वाचे असते तर बंदिशीत तत्त्वज्ञानाला महत्त्व न देता गायकीला वाव मिळणे अपेक्षित असते. गायकीत अनावश्यक बेगडी श्रृंगार नसावा, असे त्यांनी रसिकांशी संवाद साधताना सांगितले.

कै. श्रीराम (बापू) का. गोखले यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त मधुराणी गोखले-प्रभुलकर आणि अमृता गोखले-सहस्रबुद्धे यांनी ‘पितृऋण’ या उपक्रमाअंतर्गत शनिवारी (दि. 4) ‘शब्द-गान’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृहात केले होते.

या सांगीतिक मैफलीत पंडित कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पंडित सत्यशील देशपांडे यांनी विविध घराण्यांच्या गायकीची झलक दाखविली. (Pune News) त्यांच्याशी संगीतकार कौशल इनामदार यांनी संवाद साधला. उल्हास कुलकर्णी (तबला), सृजन देशपांडे (सहगायन) साथ केली.

Nigdi : राष्ट्रपती पदक विजेते व्यंकटेश पांडे यांचे निधन

पंडित कुमार गंधर्व यांच्याकडे तालिम घेण्याविषयी बोलताना देशपांडे म्हणाले, कुमारजींच्या स्वरांच्या विस्तीर्ण छताखाली आश्वस्त वाटायचे. त्यांच्या गायकीतील रहस्य उकलण्यासाठी, माझी समज वाढविण्यासाठी त्यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली. संगीत शिकताना सांगीतिक क्षेत्रात अनकॉमन असणारा कॉमनसेन्सही त्यांच्याकडून शिकायला मिळाला. गुरूंनी शिक्षण दिले पण पठडीचा आग्रह न धरता विचार करायला उद्युक्त करून संगीतातील अवकाश खुले करून दिले. घराण्याची नक्कल करून गायकी टिकविण्यासाठी त्यांचा आग्रह नसायचा. कुमारजींनी आपल्याला केवळ गायनच शिकविले नाही तर जीवनातील चढ-उतार, जगण्यातील नाट्य, कलात्मक जगणे यांचीही ओळख करून दिली.

अभिजात्य आणि लालित्य यामधील सुवर्णमध्य दर पिढीगणिक बदलतो आहे. शास्त्रीय संगीतात गुरू अक्षरे लांबवायला परवानगी असते. स्वरांच्या आघातानुसार प्रत्येक स्वरवाक्याचा अर्थ वेगळा होतो, त्यामुळे रागदारी संगीतात आघातांना खूप महत्त्व आहे.(Pune News) प्रत्येक बंदिशीचा एक ठराविक कार्यकाळ असतो. रागाचे चलन न मोडता नवनिर्मिती करणे फार कठीण असते, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. केवळ सांगीतिक मैफल आयोजित न करता संवादात्मक सादरीकरणामुळे गायकीतील सूक्ष्म सौंदर्यस्थळे दाखविता आली या बद्दल देशपांडे यांनी गोखले कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

सुरुवातीस मधुराणी गोखले-प्रभुलकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कलाकारांचा सत्कार डॉ. विद्या गोखले यांनी केला. कार्यक्रमास संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.