PMC Corona Vaccination : कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात, महापौरांनी घेतला डोस

एमपीसी न्यूज – ‘कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी असून लस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. चौथ्या टप्प्यात लसीकरणासाठी मनपा हद्दीतील नागरिकांची संख्या 15 लाखांपर्यंत असून या चौथ्या टप्प्यासाठी आपल्या सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोना लसीकरण मोहिमेच्या शहरातील चौथ्या टप्प्याची सुरुवात महापौर मोहोळ यांना पुणे महानगरपालिकेच्या सुतार दवाखान्यात लस देऊन करण्यात आली. महापौर मोहोळ यांनी ‘मेड इन पुणे’ असलेल्या कोविशील्ड लसीचा डोस घेतला.

लसीकरण झाल्यानंतर महापौर म्हणाले, ‘कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तर वेगाने आणि व्यापक लसीकरण आणि तपासण्या वाढवण्याकडे आपला कल आहे. आताच्या कालावधीत कोरोना लस ही ‘संजीवनी’प्रमाणे असून पात्र असलेल्या नागरकांनी वेळ न दवदडता लस घ्यावी.’

‘लसीकरण केंद्रावरील सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या अडचणी आता पूर्णपणे दूर झालेल्या आहेत. शिवाय लसीची आवकही मुबलक झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही शंका मनात न ठेवता लसीकरणासाठी पुढे यावे. चौथ्या टप्प्यात जवळपास 15 लाख नागरिक लसीसाठी पात्र झाले आहेत. या मोठ्या संख्येनुसारच लसीकरण केंद्रांची सज्जता ठेवली जात आहे’, असेही महापौर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.