Chinchwad Crime News : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘त्या’ 38 सराईतांना घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने 38 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी ताब्यात घेतले. खून आणि खूनी हल्ल्याचे दोन किंवा त्यापेक्षा जादा गुन्हे असलेल्या गुन्हेगारांचा यात समावेश आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात गुन्हेगार देखील सरसावण्याची शक्यता आहे. अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहावा यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांचे गुंडा विरोधी पथक कामाला लागले आहे. शहरात खून आणि खुनी हल्ल्याचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची पोलिसांनी कुंडली तयार केली आहे.

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजताच्या दरम्यान गुंडा विरोधी पथकाने 87 सराईत गुन्हेगारांच्या घरी धडक दिली. त्यातील 19 खूनातील आरोपी आणि 19 खुनी हल्ल्यातील आरोपी असे एकूण 38 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या हे आरोपी काय काम करीत आहेत याची माहिती गुंडा विरोधी पथकाने घेतली तसेच त्या सराईत गुन्हेगारांचा ई-मेल आयडी, फेसबुक अकाऊंट, इंस्टाग्राम अकाऊंट, स्वतःचा, जवळच्या मित्राचा व नातेवाइकांचा मोबाइल नंबरही पोलिसांनी आपल्या रेकॉर्डवर घेतला.

जेलमधून सुटून आल्यावर या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे का, याचीही माहिती पोलिसांनी घेतली आहे. या गुन्हेगारांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार होऊ नये अशी समज देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.