Chinchwad Crime News : चोरलेली कार विक्रीची जाहिरात ‘ओएलएक्स’वर; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – चोरी केलेली आलिशान कार ‘ओएलएक्स’ वर विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटक येथील एका तरुणाला चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 44 लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) बेंगळुरू-मुंबई महामार्गावर ताथवडे येथे करण्यात आली.

चेतन बसवराज म्हेत्रे (वय 26, रा. भातब्रा, ता. भालकी, जि. बिदर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी म्हेत्रे याने कर्नाटकातील बेंगलोर येथून महागडी आलीशान कार चोरी केली. या वाहन चोरीप्रकरणी बेंगलोर येथील राममूर्तीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी म्हेत्रे याने ती कार विकण्याची जाहिरात चक्क ओएलएक्सवर दिली.

‘ओएलएक्स’ या ॲपवरून वाहन विक्रीबाबत माहिती दिलेल्या एका व्यक्तीशी म्हेत्रे याने संपर्क साधला. तुम्ही माझ्याकडील गाडी खरेदी करणार का, असे आरोपी म्हेत्रेने विचारले. त्यावेळी गाडी चोरीची असल्याचा संशय संबंधित व्यक्तीला आला. त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना याबाबत माहिती दिली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने सापळा लावला. संबंधित व्यक्तीने कार खरेदी करण्याची तयारी दर्शविली. तसेच कारची प्रत्यक्ष पाहणी करायची आहे, असे आरोपी म्हेत्रेला सांगितले. त्यानुसार म्हेत्रे याने ताथवडे येथे महामार्गालग कार पाहण्यासाठी बोलावले. त्यावेळी गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी आरोपी म्हेत्रेला पकडून 44 लाख रुपये किमतीची कार जप्त केली. आरोपी म्हेत्रे आणि जप्त केलेली गाडी बेंगलोर येथील राममूर्तीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गंगाराम चव्हाण, विजय तेलेवार, गणेश मेदगे, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.