Pune : जवळपास 50 चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असणारे दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – जवळपास 50 चोरीचे गुन्हे दाखल असणा-या दोघांना पोलिसांनी सोमवारी (दि.10) सकाळी सव्वासहाच्या दरम्यान मांजरी बुद्रुक येथे सापळा रचून ताब्यात घेऊन तब्बल 30 लाख 79 हजार 820 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. 

राजू खेमू राठोड उर्फ राजाभाऊ खेमराज राठोड (वय 34, रा. वडगाव शेरी) शंकरराव उर्फ शिवा रामदास बिरादार (वय 34, रा. लोणी काळभोर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खब-याकडून 9 सप्टेंबरला पुणे व पिंपरी चिंचवड तसेच पुणे ग्रामीण भागात चैन स्नॅचिंग व बॅग लिफ्टिंग यांसारखे गुन्हे करणारे दोघेजण हेलमेट घालून मोटारसायकलवर मांजरी बुद्रुक येथील मोरे वस्ती येथून येताना पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्या दोघांना सोमवारी(दि.10) सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान सापळा रचून ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींजवळ मोटरसायकलीची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचाजवळ अर्धवट तुटलेले सोन्याचे दागिने मिळाले. याचबरोबर चोरीच्या वेळी डोळ्यात मारण्यासाठी वापरात येणारा स्प्रे आणि स्टीलचा फायटर अशा वस्तू मिळाल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर जास्त संशय आल्याने त्या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली.

चौकशी दरम्यान त्यांनी ती मोटारसायकल चोरीची असल्याचे कबूल केले व त्याचसोबत यापूर्वी केलेले चोरीचे गुन्हे देखील कबूल केले. 100 च्या आसपास चैन व बॅग चोरल्याचे त्यांनी कबूल केले. पुणे शहर व आसपासच्या ठिकाणांहून त्यांनी केलेल्या जवळपास 44 गुन्ह्यांची नोंद असून त्यातील चोरीच्या एकूण मुद्देमालापैकी एकूण 30 लाख 79 हजार 820 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.