Pimpri: रेशनकार्ड, आधारकार्डला लिंक नसलेल्या नसलेल्या कामगारांनाही शिधा द्या – नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर आहे. भारतातील विविध राज्यातून नागरिक आपल्या उपजिविकेसाठी शहरात स्थलांतरीत झाले आहेत. मोलमजूरी करून आपली उपजिविका करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या हाताला काम नसल्याने रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांकडे रेशनकार्ड नाही. किंवा ज्यांच्याकडे आहेत. त्यांचे कार्ड आधारकार्डशी लिंक होत नाही. त्यामुळे या नागरिकांना सरकारकडून देण्यात येणारे स्वस्त, मोफत शिधा मिळण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे रेशनकार्ड नसलेल्या कामगारांनाही शिधा द्यावी अशी मागणी सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना पत्र पाठविले आहे. त्यात ढाके यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गरजू रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून स्वस्त व मोफत शिधा वाटप योजना सुरु करण्यात आली आहे. तथापि, या योजनेचा ब-याच अंशी गरजू नागरिकांना लाभ होत नसल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या रेशनकार्ड आधारकार्डाशी लिंक असणारी, रेशनकार्ड आहे पण आधारकार्डाशी लिंक नाही आणि रेशनकार्ड नसणारे अशा तीन प्रकारचे नागरिक आहेत. यामध्ये रेशनकार्ड आधारकार्डाशी लिंक असणा-यांना मदत मिळत आहे. परंतू, ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही किंवा ज्यांच्याकडे आहे. पण, आधार कार्डशी लिंक नाही. त्यामुळे या नागरिकांना शासनाकडून देण्यात येणारा स्वस्त व मोफत शिधा मिळण्यास अडचणी येत आहे. किंबहुना या नागरिकांना शासनाच्या योजनेतील शिधा अजिबात प्राप्त होत नाही.

या नागरिकांची उपासमार रोखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलावीत. शासनाचे धान्यवाटप योजनेतील शिधा मिळण्यासाठी शहरातील स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून या नागरिकांपर्यंत तातडीने शिधा पोहोच होईल अशी व्यवस्था करावी, अशी विनंती ढाके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.