Pune : अनाम प्रेम परिवाराच्या दिवाळी फराळाने सीमेवरील सैनिकांनी साजरी केली दिवाळी

एमपीसी न्यूज – अनाम प्रेम परिवार हा (Pune) समाजातील दुर्बल, दुर्लक्षित व वंचितांसाठी कार्यरत असणारा परिवार. महाराष्ट्रात तसेच देशातील काही शहरांमध्ये अनाम प्रेम परिवाराचे कार्यकर्ते समाजातील वरील घटकांसाठी कार्य करत आहेत.

अनाम प्रेम परिवारातर्फे या दिवाळीत भारतीय सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांना फराळ पाठविण्यात आला. देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या जवानांना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा, या सणाचा गोडवा अनुभवता यावा यासाठी अनाम प्रेम परिवाराच्या वतीने आपल्या देशाच्या सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांना दिवाळीचा फराळ पाठविण्यात आला.

या दिवाळीच्या फराळाच्या प्रत्येक बॉक्समध्ये चिवडा, चकली, लाडू व शंकरपाळी हे पदार्थ पाठवण्यात आले. अनाम प्रेम परिवाराच्या या उपक्रमामुळे घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या जवानांना घरगुती फराळ खाण्याचा आनंद घेता आला.

अनाम प्रेम परिवारातर्फे फराळाच्या बॉक्सेस बरोबर आपल्या देशाच्या सीमेवरील सैनिकांसाठी मुलांनी व कुटुंबातील इतर व्यक्तींनी स्वतःच्या हाताने बनवलेली शुभेच्छा पत्रेही पाठविण्यात आली, असे अनाम प्रेम परिवाराचे अनिल मोरे यांनी सांगितले.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा तसेच इतर ठिकाणाहून दिवाळीचा फराळ तयार करण्यात आला. आपल्या परिवारापासून दूर असलेले सैनिक प्राणांची बाजी लावून देशासाठी लढत असतात, बलिदान देतात याची जाणीव ठेवून हा उपक्रम गेली अनेक वर्षे अनाम प्रेम परिवाराकडून राबविला जात आहे.

Pune : पुणे महापालिकेच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन

लेह लडाख, अरुणाचल प्रदेश, आसाम, राजस्थान, जम्मू-काश्मीर, पंजाब- अमृतसर अशा सीमावर्ती भागातील सैनिकांसाठी हा फराळ पाठविण्यात आला. काही ठिकाणी नाविक दल आणि हवाई दलाच्या सैनिकांनाही हा फराळ पाठविण्यात आला. सीमेवरील सैनिकांना फराळ पाठविण्याचे हे कार्य गेली अनेक वर्षे या परिवारातर्फे सुरू आहे.

अनाम प्रेम परिवाराचे कार्यकर्ते हा दिवाळीचा फराळ स्वतःच्या हाताने बनवून भारतीय सीमेवरील सैनिकांना दरवर्षी पाठवत (Pune) असतात असे अनाम प्रेमचे नितीन पानसे यांनी सांगितले. कारण स्वतःच्या हाताने बनवलेल्या पदार्थांमध्ये जो प्रेमाचा, आपुलकीचा गोडवा असतो तो देशाच्या सीमेवरील प्रत्येक सैनिकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या हातून घडावे हाच त्यामागील उद्देश असतो.

गेल्या वीस वर्षांपासून हे कार्य सुरू आहे आणि यापुढेही असेच सुरू राहणार आहे, असे अनाम प्रेम परिवाराच्या हिमा नगरे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.