Pune : सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावर लवकरच बसेस धावणार -अनिरुद्ध पावसकर

एमपीसी न्यूज – सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावर लवकरच बसेस धावणार असल्याचे पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. बीआरटी मार्गातून ‘पीएमपीएमएल’च्या बसेस धावू लागतील. यादृष्टीने कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

सोमवारी ‘पीएमपीएमएल’च्या अध्यक्ष नयना गुंडे आणि पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी या मार्गाची पाहणी केली. पाच ते सहा महिन्यांपासून थांबलेल्या बीआरटी मार्गाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे, असेही पावसकर म्हणाले. आदीनाथ सोसायटी आणि बालाजीनगर येथील उड्डाणपुलाखाली बसथांबा उभारण्याचे काम दोनच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

साधारणत: महिन्याभरात या दोन्ही थांब्यांच्या चौथार्‍यांचे काम पूर्ण होईल. यानंतर या मार्गावर दोन्ही बाजूला दरवाजे असलेल्या बसेस सोडण्यात येतील. पीएमपीच्या दृष्टीनेही कात्रज ते स्वारगेट हा एकमेव मार्ग सर्वाधीक फायद्याचा आहे. त्यामुळे त्यांनीही या मार्गावर नवीन बसेस वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. कामे झाल्यानंतर थांब्यांवर ऑटोमॅटीक दरवाजे व अन्य तांत्रिक सुविधा बसविण्याची कामे करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like