Pune : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – डॉ. सुनील भिरूड

एमपीसी न्यूज : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (Pune) प्रशासकीय मंडळाने विद्यापीठात परिवर्तन घडवून आणण्यासाठी निश्चित केलेल्या ध्येय – धोरणांचे अनुरूप असे कालबद्ध नियोजन केले असून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी आम्ही सारे कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी सीओईपी येथे आज झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान केले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक डॉ प्रमोद चौधरी यांनी यावेळी डॉ. सुनील भिरूड यांचा परिचय करून दिला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे, विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे सल्लागार डॉ रविंद्र उटगीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “डॉ. भिरूड यांचा व्हीजेटीआय, मुंबई विद्यापीठ व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यासारख्या प्रतिथयश संस्थांसोबत कामाचा भक्कम अनुभव सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीत मोलाचा ठरेल. विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाकडून त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल.”

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये होत असलेले या सकारात्मक बदलांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा देखील सक्रीय आणि सर्वसमावेशक सहभाग असून त्याबद्दल अधिक माहिती देताना डॉ चौधरी म्हणाले, “आज जगभरात संस्थेचे साधारणतः 45 हजारांहून अधिक माजी विद्यार्थी असून ते आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. अमेरिकेत स्थायिक असलेले नरेंद्र काळे, आशिष अचलेरकर, रोहन केळकर यांसारख्या अनेकांनी विद्यापीठासाठी भरीव काम करण्याची इच्छाही वेळोवेळी व्यक्त केली आहे. यावर काय करता येईल हा विचार आम्हीही करीत असून विद्यापीठातील सोयी सुविधा विकसित करण्यासोबतच विद्यार्थांना आवश्यक ज्ञानाचे आदानप्रदान, संशोधनासाठी अनुदान उभे करणे, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील ज्ञान मिळावे या दृष्टीने इंटर्नशिपसाठीच्या संधी उपलब्ध करून देणे आदी बाबींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

नुकताच केपीएमजी या जागतिक दर्जाच्या सल्लागार संस्थेने विद्यापीठातील विविध बाबींचा अभ्यास करून दिलेल्या अहवालानुसार काही बाबींची प्राधान्याने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील डॉ चौधरी यांनी यावेळी दिली. ते म्हणाले “याअंतर्गत विद्यार्थ्यांचा सीओईपी मधील अनुभव सर्वदृष्टीने जास्तीत जास्त समृद्ध करणे, बहुशाखीय दृष्टीकोन विकसित करणे, उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण देण्याच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सोयी सुविधांमध्ये सुधार करणे, उद्योग क्षेत्रासोबत विद्यार्थ्यांना फायदेशीर सहयोग करार करण्यावर भर देणे, उद्योजकता विकास व नवतंत्रज्ञान संशोधनाला मोठ्या प्रमाणात चालना देणे, विद्यापीठाच्या शिक्षणपद्धतीत डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देणे आदींवर लक्ष केंद्रित करण्यावर आम्ही भर देत आहोत.”

गेल्या काही दिवसात विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षकांना मिळालेल्या प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचे देखील प्रकल्प असून त्यांच्याविषयी डॉ चौधरी यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पांमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचा ‘अॅग्रीकल्चरल रिवायटलायजेशन इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स एशियन कंट्रीज एजीआरएचआय’ हा तीन (Punr) वर्षांचा प्रकल्प असून त्यासाठी 56.85 लाख रुपये इतके अनुदान मिळाले आहे. याच विभागाअंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास या दिल्लीतील संस्थेकडून आलेला एआरएमआरईबी स्कीम अंतर्गत गन नियंत्रण सिस्टीमच्या फिसीबल अॅनालिसीस अँड एक्स्पेरिमेंटल स्टडीसाठीचा तीन वर्षांचा व रु 99.60 लाखांचे अनुदान असलेला प्रकल्पही आहे.

Pimpri : डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिवराज्याभिषेक 350 व्या सोहळ्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

शिवाय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील ‘डेटा क्युरेशन फॉर व्हिडीओ सर्व्हीलन्स अँड प्रिसिजन अॅग्रीकल्चरल डेटा’ व ‘अॅक्शनेबल इनसाईट्स इन इमेज युझिंग डीप लर्निंग आणि इंफ्लूएन्सर आयडेन्टीफिकेशन युझिंग एनएलपी अँड डीप लर्निंग हा अनुक्रमे रु 80 लाख व रुपये 40 लाख अनुदान असलेला प्रकल्प असून विद्यापीठाची ही घोडदौड खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांचा उत्साह वाढविणारी असल्याचे डॉ चौधरी म्हणाले.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेसोबतच्या भागीदारीच्या प्रगती संदर्भात आणखी तपशील देताना डॉ. भिरूड म्हणाले, “या भागीदारी अंतर्गत गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे प्राध्यापक सीओईपी मध्ये अभियांत्रिकी अर्थशास्त्राचे वर्ग घेत असून यासाठी तृतीय वर्षाच्या अभियांत्रिकी वर्गातील तब्बल 179 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगचे सर्वाधिक 82, इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगचे 31, इलेक्ट्रॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे 48 आणि इंन्स्ट्रूमेंटेशन व कंट्रोल इंजिनिअरिंगचे 18 विद्यार्थी यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनाही या विषयाचे महत्त्व समजले असून त्यांनी या अभ्यासक्रमाला सकारात्मक प्रतिसाद असल्याचे स्वत: विद्यार्थ्यांनीच आम्हाला कळविले आहे.”

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत असताना आणखी एक पाऊल पुढे टाकत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पब्लिक पॉलिसी क्षेत्रात सकारात्मक वाटचाल करीत आहे असे सांगत डॉ प्रमोद चौधरी म्हणाले, “गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होणाऱ्या एआयएमएल सारख्या तंत्रज्ञानाचा भविष्यात होणारा दुरुपयोग टाळून मानवी हित साधायचे असेल तर या क्षेत्रासाठी अभियंत्यांना देखील पब्लिक पॉलिसीबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने आता सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ व फ्लेम विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार हे. याद्वारे दोन्ही संस्थांमध्ये ज्ञानाचे आदानप्रदान होईल असा आमचा विश्वास आहे. यामध्ये अभियांत्रिकीचे विद्यार्थी सामजिक धोरणांबद्दल तर फ्लेम विद्यापीठाचे विद्यार्थी अभियांत्रिकी संबंधी तांत्रिक विषयांचे ज्ञान प्राप्त करतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.