Pune Crime News : पोलीस आयुक्तांचा आणखी एक मोक्का, पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीवर कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीवर मोक्कानुसार (महाराष्ट्र संघटीत नियत्रंण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. नऊ जणांचा समावेश असून, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ४१ वी मोक्का कारवाई आहे. मोक्का कारवाईने गुन्हेगारांचे कंबरडे मोडले जात आहे.

अल्ताफ उर्फ बचक्या इक्बाल पठाण, सागर उर्फ पार्थ ज्ञानेश्वर भांडे, मोहरम उर्फ सम्या शफी शेख, शहाबाज उर्फ डी शरीफ नदाफ, राजेश मंगल मंडल उर्फ चौपाट्या, इमाम जलालउद्दीन सय्यद, महादेव उर्फ महादेव गौतम थोरात, अलिशान उर्फ अली रफिक शेख व जय उर्फ नन्या उर्फ विलास तुपे अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरात लुटमार करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. एक प्रवाशाला वाघोलीत सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात घेऊन त्यांना लुटण्यात आले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात 8 जणांना अटक केली होती. चौकशीनंतर अल्ताफ उर्फ बचक्या पठाण हा टोळी प्रमुख असून, त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याचे समोर आले होते. तर, त्यांनी या भागात वर्चस्व रहाण्यासाठी वेगवेगळ्या साथीदारांना घेऊन गुन्हे केल्याचे समोर आल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाची डॉ. संजय शिंदे यांनी छाननी केली. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्कानुसार कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्विकारल्यापासून तब्बल 41 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. त्यात मटका किंगपासून टोळ्याचे म्होरके तसेच कुविख्यात गुन्हेगार आणि चोऱ्या करणाऱ्यांचा देखील समावेश आहे. मोक्का कारवाईने मात्र गुन्हेगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.