Pune Crime News : बारावीच्या विद्यार्थ्यांनीकडे शरीरसुखाची मागणी, पुण्यात शिक्षकाची रस्त्यावरून धिंड

एमपीसी न्यूज – बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका शिक्षकाला संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला आहे. या शिक्षकाची पुण्यातील रस्त्यावरून धिंड काढत त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले.

अभिजित पवार असे संबंधित शिक्षकाचे नाव आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्याच्या मध्यवस्तीत हे महाविद्यालय आहे. मागील अनेक दिवसांपासून हा शिक्षक संबंधित तरुणीकडे गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी कऱत होता. परंतु संबंधित तरुणीने त्याला वारंवार नकार दिला होता. तरीदेखील या शिक्षकाचा जाच सुरू होता. अखेरीस या तरुणीने संबंधित शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला आणि घरच्यांना दाखवला.

त्यानंतर आज दुपारच्या सुमारास संबंधित तरुणीच्या नातेवाईक आणि इतर काही व्यक्तींनी महाविद्यालयात जाऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला. तर काहींनी त्याच्या तोंडावर शाई टाकत मारहाणही केली. त्यानंतर महाविद्यालयापासून ते विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत या शिक्षकाची धिंड काढण्यात आली. संतप्त झालेल्या जमावाने मारहाण करतच या शिक्षकाला पोलीस ठाण्यात आणले होते. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकाराची माहिती घेत आहेत. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.