Pune Crime News : माहेरच्या लोकांशी संबंध तोडण्यास सांगितल्याने विवाहितेची आत्महत्या

एमपीसीन्यूज : “तू गरीब घरातील आहेस, माहेरी जायचे नाही आणि माहेरच्या लोकांशी बोलायचे ही नाही” असे सांगत सासरच्यांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या मोहम्मदवाडी येथील सय्यद नगर मध्ये हा प्रकार घडला. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तबसुम सलमान सय्यद (वय 22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मयत विवाहितेची आई मेहरून सय्यद यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये तबसुमचा विवाह सलमान सय्यद याच्यासोबत झाला होता. तेव्हापासून ती सासरी नांदत असताना सासरकडच्या लोकांनी ‘तू गरीब घरची आहेस, आजपासून तू माहेरी जायचे नाही, माहेरच्या लोकांशी असलेले संबंध तोडून टाक, असे म्हणत तिचा छळ केला.

तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्याला कंटाळूनच अखेर तिने 22 सप्टेंबर रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वरपडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.