Pune Crime News : भवानी पेठेत सापडलेल्या ‘त्या’ खुनाचे गूढ उकलले

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानी पेठेतील एका घरात सडलेल्या अवस्थेत सुमैया सलीम शेख (वय 35) या महिलेचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली.

सलीम शकील शेख (वय 40, रा. भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत महिला पुण्यातील बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करीत होती. बुधवारपेठेतच तिची ओळख सलीम शेख याच्यासोबत झाली होती. काही काळानंतर दोघांनीही लग्न केले होते. त्यानंतर भवानी पेठेतील एका भाड्याच्या घरात ते राहत होते. सलीम शेख हा बायकोला सकाळी बुधवार पेठेत नेऊन सोडायचा आणि रात्र झाल्यानंतर परत घेऊन यायचा.

सलीम शेख याचे आधी एक लग्न झाले होते. तर आणखी एका महिलेसोबत त्याचे अफेअर सुरू असल्याचा संशय सुमैया हिला होता. यावरून त्यांच्यात वाद होते. असेच एकदा भांडण सुरू असताना रागाच्या भरात सलीम याने सुमैया हीचा गळा दाबून खून केला आणि घराला बाहेरून कुलुप लावून निघून गेला. दरम्यान 18 जून रोजी घरातून वास येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी येऊन पाहणी केली असता सडलेल्या अवस्थेत सोमय्या हिचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

दरम्यान शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत होते. प्राथमिक तपासात पोलिसांना खुनाचा संशय होता. त्यानंतर सुरू असलेल्या तपासादरम्यान सुमय्या ही सलिम त्याच्यासोबत राहत असल्याचे समोर आले होते. तसेच खून झाल्यापासून सलीम हा बेपत्ता होता. त्यानंतर पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात परिस्थितीजन्य पुराव्यावरून सलीम यानेच सुमय्या तिचा खून केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.