Pune : डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा – शरद पवार

वनराईतर्फे 'स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार' प्रदान

एमपीसी न्यूज – आज जगातील (Pune) पाच पैकी तीन व्यक्ती सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत. पूनावाला यांच्यामुळेच भारत कोरोना सारख्या संकटातून बाहेर पडू शकला, त्यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता केवळ पद्मभूषण पुरस्कारापुरते त्यांना मर्यादित न ठेवता, त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉ. सायरस पुनावाला यांना वनराई फाउंडेशन तर्फे शरद पवार यांच्या हस्ते ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वनराईचे विश्वस्त गणपतराव पाटील, सचिव निलेश खांडेकर, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सायरस पूनावाला यांना शुभेच्छा दिल्या.

शरद पवार म्हणाले, डॉ. मोहन धारिया यांनी आपल्या राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली, राष्ट्र प्रथम ही मोहन धारिया यांचे विचारसरणी होती. सिरम इन्स्टिट्यूट हे एक प्रकारे त्यांच्याच विचारांवर वाटचाल करून केवळ देशाचाच नव्हे तर जगातील प्रत्येकाचा विचार करून लस निर्मिती करत आहे. आज जगातील पाच व्यक्तींपैकी तीन व्यक्ती सिराम (Pune) इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत, यावरूनच सिरम इन्स्टिट्यूट चे जागतिक स्तरावरील योगदान आपल्याला लक्षात येऊ शकते, त्यांनी दिलेले हे योगदान लक्षात घेता सायरस पूनावाला यांचे कर्तृत्व केवळ पद्मभूषण पुरस्काराने गौरवित न करता त्यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.

सायरस पूनावाला म्हणाले, डॉ. मोहन धारिया हे जेव्हा देशाच्या नियोजन समितीचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी आमच्या सिरम इन्स्टिट्यूट च्या वाटचालीमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते, त्यानंतरही त्यांनी श्रीराम इन्स्टिट्यूटला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले, सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वाधिक लस निर्माण करणारी संस्था व्हावी असे माझे स्वप्न नव्हते, तर आज कोट्यावधी लहान मुलांचे जीव आमच्या संस्थेने तयार केलेल्या लसीमुळे वाचत आहेत ही एक प्रकारे समाधानाची बाब आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सायरस पुनावाला यांचे योगदान हे डॉ. मोहन धारिया यांच्याप्रमाणे राष्ट्र निर्मितीचे आहे, डॉ. मोहन धारिया यांच्या नावाचा पुरस्कार त्यांना देऊन एक प्रकारे या पुरस्काराची उंची वाढली आहे. डॉ. मोहन धारिया यांनी भारतीय राजकारणाला वेगळी उंची निर्माण करून दिली त्याचप्रमाणे डॉक्टर सायरस पुनावाला यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामामुळे केवळ देशालाच नव्हे तर जगाला मोठ्या संकटातून दूर केले आहे.

नितीन गडकरी म्हणाले, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तीमुळे आज देश विज्ञान तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. तरुणांना कॅन्सर मुक्त करण्याचा ध्यास डॉ. सायरस पूनावाला यांनी घेतला आहे ते निश्चितच या प्रयत्नामध्ये यशस्वी होतील. डॉ. मोहन धारिया यांचा राजकीय पिंड हा ज्याप्रमाणे रचनात्मक होता त्याचप्रमाणे डॉ. सायरस पुनावाला यांचा संशोधन आणि वैद्यकीय पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच दोन्ही महान व्यक्तींनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाची निर्मिती करण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे.

Pune : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची जगदीश मुळीक यांनी शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात घेतली भेट

डॉ. वेद प्रकाश मिश्रा म्हणाले, आधुनिक भारताचा विचार करता विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील तीर्थक्षेत्र जर देशातील निवडायची झाली तर सायरस पुनावाला यांचे सिराम इन्स्टिट्यूट हे एक मोठे तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याला सांगता येईल, कोविड काळामध्ये जगातील 47 देशांना सिरम इन्स्टिट्यूटने माफक दरामध्ये लस उपलब्ध करून देऊन लहान मुलांचेच नव्हे तर नागरिकांचे प्राण वाचवले. आजही देशांमध्ये निर्माण होणाऱ्या 89% लस्सींचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट मध्ये होते ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे.

डॉ. गिरीश गांधी म्हणाले, कोणताही राजकीय पक्ष सत्तेमध्ये गेल्यानंतर पक्षाची समाजाविषयी असणारी ध्येयधोरणे शिथिल होतात. परंतु, मोहन धारिया यांनी कायम सत्ताधाऱ्यांना समाज केंद्रित वागण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी समाजाशी नाळ कधीही तुटू दिली नाही, त्यांच्याच मार्गावर एक प्रकारे सायरस पुनावाला काम करत आहे त्यामुळे हा पुरस्कार निश्चितच अतिशय योग्य व्यक्तीला देण्यात आला आहे.

रवींद्र धारिया म्हणाले, वनराईच्या पहिल्या ग्राम विकासाचे उद्घाटन शरद पवार यांनी १९८४ मध्ये केतकावळे या ठिकाणी मुख्यमंत्री असताना केले होते. डॉ. मोहन धारिया यांचे उद्दिष्ट जंगल, जमीन आणि जल यांचे संवर्धन करणे हे होते, हा आजही संस्थेचा मुख्य हेतू आहे, लोकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षण करणे आणि तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळवून देण्यासाठी आजही वनराई संस्था कटिबद्ध आहे. डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र धारिया यांनी प्रास्ताविक केले. रोहिदास मोरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.