Pune : गरजूंना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू ठेवणार – जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

एमपीसी न्यूज – सध्याच्या संसर्ग जन्य परिस्थितीत तसेच संचार बंदीच्या काळातही दवाखान्यातून गरजूंना अत्यावश्यक सेवा चालू ठेवणार असल्याचे जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणेच्या अध्यक्षा डॉ. रूपा अगरवाल यांनी एका पत्रकाद्वारे हे स्पष्ट केले आहे.

डाॅ. अगरवाल म्हणाल्या, सुरुवातीला अनेक डॉक्टर्स त्यांच्या सेवा आणि भूमिका यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे गोंधळात होते. ‘पीपीई किट’ योग्य प्रमाणात उपलब्ध नसतानाही हाती असलेल्या सामग्री सहित आम्ही रुग्णांना शक्य ती सेवा देत आहोत.

अर्थात सरकारतर्फे वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शक सूचना, उपलब्ध चिकित्सा केंद्र, विलगीकरण केंद्र यासंदर्भात वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमुळे या सेवा देणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळेच सर्व डॉक्टरांचा आत्मविश्वासही वाढला आहे. या पुढे ही संघटनेचे सर्व डॉक्टर दवाखान्यातून गरजूंना अत्यावश्यक सेवा देणे चालू ठेवणार आहेत.

या आपत्कालीन काळामध्ये लोकसेवेच्या भावनेतून रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता आम्ही करू, असा विश्वास अगरवाल यांनी व्यक्त केला आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए) ही पुण्यातील विविध पॅथींच्या डॉक्टरांची शिखर संघटना असून गेली तीस वर्षे पुण्यात कार्यरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.