Nehru Stadium : नेहरू स्टेडियमला कोणी वाली आहे का?

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – पुनीत बालन यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या निमित्ताने खूप वर्षांनी पुण्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमला (Nehru Stadium) जाणे झाले आणि या स्टेडियममधील स्टँडची एकूण अवस्था पाहून मन विषण्ण झाले.

एकेकाळी या नेहरू स्टेडियमचा (Nehru Stadium) दरारा होता. आंतराष्ट्रीय असो, रणजी करंडक असो किंवा दुलीप करंडक असो, किंवा अगदी साधा क्लब लेवलचा सामना असो, पुणेकरांना सामना बघण्याचे हक्काचे ठिकाण होते. तेही मध्यवस्तीत असल्याने पेठेतील आणि कोथरूड मधील लोकांसाठी हक्काचे व्यासपीठ होते.

किती तरी युवा पिढीतले फलंदाज आणि गोलंदाज तिथे पाहाताना आमच्यासारख्या लहानग्याना खूप प्रेरणा मिळायची. म्हणजे प्रत्येकाचे स्वप्न असायचे की, एकदा तरी या मैदानावर आपण खेळायला हवे.

Raj Thackeray : राज ठाकरेंना परळी न्यायालयाचा 500 रुपये दंड,अटक वॉरंट रद्द

आज मागे वळून पाहाताना कितीतरी आंतराष्ट्रीय दर्जाचे फलंदाज तसेच अव्वल असलेले गोलंदाज हे पहिल्यांदा आपण पुणेकरांनी तिथेच पाहिले, नव्हे अनुभवले.

नंतर काही तिकिटांवरून वाद झाल्याचे आपल्या कानावर आले. त्यानंतर मात्र तिथे सामना न होता पुण्यातील सामने गहुंजे येथे व्हायला लागले. ही जरी चांगली गोष्ट असली तरी मुख्य पुण्यातल्या लोकांना तिथे जाणे हे गैरसोयीचेच होते आणि आहे.

पुणे शहर आज जरी कितीही विस्तारले तरी 80 आणि 90 च्या दशकाआधीचे मूळ पुणेकर आहेत, त्यांना आजही पंडित नेहरू स्टेडीयम (Nehru Stadium) हेच त्यांच्यासाठी पुण्याची ओळख आहे.

आणि त्यामुळेच महानगरपालिकेच्या ताब्यात (निदान माहिती तरी तशीच आहे) असलेल्या या स्टेडियमची दुरवस्था होता कामा नये. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आकर्षक रूप देऊन आणि मुख्य म्हणजे सगळे वाद मिटवून इथे पुन्हा एकदा सामने किमान राष्ट्रीय दर्जाचे तरी रणजी करंकडाचे वैगरे सामने येथे होऊ द्यावेत. याबद्दल सगळ्यांनीच विचार करून कृती करण्याची गरज आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.