Pune News : शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि पुरस्कार वितरणाने होणार ‘नृत्योत्सव 2022’ची सांगता

एमपीसी न्यूज – नृत्य कलामंदिर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘नृत्योत्सव 2022’चे आयोजन करण्यात आले आहे. हा शास्त्रीय नृत्य आणि लोककला महोत्सव पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरात होत आहे. या महोत्सवाचा समारोप सोहळा पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर आणि पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे होणार आहे.

शुक्रवारी (दि. 29) सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणा-या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच अभिनेते मयुरेश पेम हे उपस्थित राहणार आहेत.

‘उत्कृष्ठ बालकलाकार’ सृष्टी कनोजिया, ‘आउटस्टॅंडिंग युवा कलाकार’ मनमीत पेम, ‘उत्कृष्ठ नृत्यगुरु’ अर्जुन जाधव आदी पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमात केले जाईल. नृत्य कलामंदिर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘अश्विनी पुरस्कार’ सुरु केला आहे. हा पुरस्कार दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. शास्त्रीय नृत्य आणि अभिनय क्षेत्रात समांतर कामगिरी केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष आहे. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे.  रोख रक्कम 25 हजार रुपये आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ नृत्यांगना स्वाती दैठणकर, ज्येष्ठ कलाकार नंदकिशोर कपोते, नाट्य लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम, ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार, नृत्य कलामंदिरच्या संचालिका तेजश्री अडिगे यांचा समावेश आहे.

शुक्रवारी (दि. 29) दुपारी 12.30 ते 4.30 या वेळेत कोरिओग्राफी महोत्सव होणार आहे. आर्टीट्यूड पुणे संस्थेच्या स्मिता महाजन यांच्या नृत्याने या महोत्सवाची सुरुवात होईल. याचबरोबर यामध्ये नंदकिशोर कल्चरल सोसायटी, कलावर्धिनी पुणे, नुपूरनाद डान्स अॅकॅडमी, शर्वरी जोमिनीस डान्स कंपनी, आकांक्षा ओडिसी नृत्यालय या संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत. ते आपल्या पारंपारिक शास्त्रीय संरचानांचे सादरीकरण करतील.

या संपूर्ण दिवसाचा लक्षवेधी समारोप होणार आहे. बाजी फेम नुपूर दैठणकर भरतनाट्यम आणि सिनेतारका अदिती भागवत यांच्या कथ्थक नृत्याने हा समारोप होईल. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी साडेपाच वाजता घोले रोड पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.