Pune News: रेखाचित्रातून झाली गुन्ह्यांची उकल; प्रशिक्षित पोलिसांना डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप

एमपीसी न्यूज: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरू झालेल्या रेखाचित्र अभ्यासक्रमातील पोलिसांनी काढलेल्या रेखाचित्रामुळे काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यात वर्षभरापूर्वी सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराच्या माध्यमातून गुन्ह्यातील संशयित व आरोपींच्या रेखाचित्रणाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता.

बुधवारी १५ डिसेंबर रोजी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या दुसऱ्या बॅचमधील पोलिसांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार, कारागृह व सुधारसेवाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे सहकार्यवाह महादेव सगरे, प्रा.डॉ. गिरीश चरवड, अपर पोलीस अधीक्षक अनुजा देशमाने, पोलीस अधीक्षक संभाजी कदम, रसायनशास्त्र विभागाचे डॉ. अविनाश कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राज्यातील बाराशेहून अधिक पोलीस या अभ्यासक्रमासाठी उत्सुक असल्याचे देशमाने यांनी सांगितले. यावेळी रितेश कुमार म्हणाले, पोलिसांच्या या कामाचा समाजासाठी उपयोग व्हावा. तर अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता यात अधिक ज्ञान संपादन करावे.

तर डॉ. गिरीश चरवड म्हणाले, ‘आय व्हिटनेस’ ना प्रश्न कसे विचारावे, तसेच घाबरलेल्यांना कसा आधार देऊन त्यांना बोलतं करावं याचंही या अभ्यासक्रमात दिलं जातं. खुशालचंद वाळुंजकर यांनी या अभ्यासक्रमात प्रथम येण्याचा मान पटकावला. यावेळी आपले मनोगतही त्यांनी व्यक्त केले.

विद्यापीठाने सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम निर्माण करायला हवे- डॉ. नितीन करमळकर

डॉ. नितीन करमळकर म्हणाले , विद्यापीठाने सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम निर्माण करायला हवेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाची गुन्ह्यांची उकल करण्यास मदत झाली ही आनंदाची बाब आहे. भविष्यात ‘फॉरेन्सिक सायन्स’ या विषयातही एकत्रित काम करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.