Pune News : ‘दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन’च्या जागेचा करार वाढवून द्या – प्रशांत जगताप

एमपीसी न्यूज – नाना पेठ येथे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा जोतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा जोतिराव फुले मुलांचे हायस्कूलमधून बहुजन समाजातील बहुसंख्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  या संस्थेस देण्यात आलेल्या जागेचा करार हा पूर्वीच्याच दराने आणि आणखी 30 वर्षांसाठी वाढवून द्यावा. मुदतवाढ न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला

महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नाना पेठ येथे दी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेला कराराने जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, हा करार फेब्रुवारीमध्ये संपुष्टात आला आहे. त्यानंतर या संस्थेचा करार वाढवून देण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत.

या जागेला बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे. या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, महात्मा जोतिराव फुले मुलींचे हायस्कूल, महात्मा जोतिराव फुले मुलांचे हायस्कूलमधून बहुजन समाजातील बहुसंख्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुजन समाजातील अनेक पिढ्या घडविण्याचे काम या संस्थेने केले आहे.

अशा परिस्थितीत महापालिकेने गेल्या जवळपास 90 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या संस्थेचा इतिहास आणि संस्थेमार्फत सुरू असलेले कोणतेही कार्य लक्षात घेतलेले दिसत नाही. महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी या जागेकडे केवळ महापालिकेची जागा म्हणून न पाहता बहुजनांची पिढी घडविणारी संस्था म्हणून पाहावे, म्हणजे त्याचे महत्त्व लक्षात येईल.

दुर्दैवाने महापालिकेतील सत्ताधारी भाजप व या पक्षाचे महापालिकेतील पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचाच प्रयत्न करीत असल्याची शंका आहे. इतर संस्थांच्या तुलनेत येथे आकारण्यात येणारी फी अगदी कमी असल्याने ती विद्यार्थ्यांना परवडत आहे. शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे. त्यामुळे हे महाविद्यालय व हायस्कूल आहे त्याच जागेत यापुढेही सुरू राहणे ही येथील विद्यार्थ्यांची गरज आहे.

त्यामुळे महापौर, आयुक्त व सभागृह नेत्यांनी याबाबत लवकर पावले उचलून संस्थेला पुढील 30 वर्षांसाठी आणि पूर्वीच्याच दराने करार वाढवून द्यावा. याबाबत राज्य सरकारशी संबंधित कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास महाविकास आघाडी सरकारकडून ती अडचण दूर करून परवानगी मिळवून देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वीकारत आहे,  अशी ग्वाही मी शहराध्यक्ष या नात्याने देत आहे असे जगताप म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.