Pune News: येत्या दहा दिवसांत होणार कर्वे रस्त्याची डागडुजी- गौतम बिऱ्हाडे

कर्वे रस्त्यावरील विविध समस्यांवर ठोस समाधान शोधण्यासाठी व रस्ता त्वरित दुरुस्त करण्यासाठी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने मेट्रो व पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.

एमपीसी न्यूज – येत्या दहा दिवसांत कर्वे रस्त्याची डागडुजी करण्यात येणार असल्याचे आश्वासन मेट्रोचे अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी दिले.

कर्वे रस्त्यावरील विविध समस्यांवर ठोस समाधान शोधण्यासाठी व रस्ता त्वरित दुरुस्त करण्यासाठी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने मेट्रो व पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पौड फाटा ते डेक्कनपर्यंत असलेल्या विविध समस्यांवर प्रत्यक्ष कृती करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी मेट्रोचे अधिकारी गौतम बिऱ्हाडे, पुणे मनपा पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे, भाजपचे शहर चिटणीस प्रशांत हरसुले, क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, शिवाजी शेळके व अनेक अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

पुणे मेट्रो आणि मनपाचे अधिकारी या रस्त्याबाबत एकमेकांकडे बोट दाखवत होते. त्यामुळे आज दोन्ही यंत्रणांना एकत्र बोलवून समस्यांवर समाधान शोधण्याचा प्रयत्न केल्याचे क्रिएटिव्हचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यानंतर गौतम बिऱ्हाडे यांनी येत्या दहा दिवसांत सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असमतोल रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण केले जाईल व ड्रेनेज लाईन पावसाळी लाईन यांची सफाई करुन ज्या जाळया किंवा झाकणे दुरावस्थेत आहेत त्या बदलण्यात येतील, असे सांगितले.

येत्या दोन महिन्यांत नळस्टॉप ते पौड फाटा येथील पदपथ नव्याने तयार केला जाईल. तसेच पौड फाट्यावर मेगासिटी समोरच्या रस्त्याची दुरावस्था देखील दूर करण्यात येइल असेही ते म्हणाले. तर, खंडुजीबाबा चौक ते नळस्टॉप येथे जेथे-जेथे पदपथ नादुरुस्त आहे. तेथे-तेथे आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येइल असे डोंबे यांनी स्पष्ट केले.

मंजुश्री खर्डेकर यांनी विविध ठिकाणी पडलेल्या राड्यारोड्याकडे लक्ष वेधले व सर्व साहित्य त्वरित हलविण्याची मागणी केली. शिवाजी शेळके यांनी स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या अडचणी मांडल्या. येत्या दहा दिवसांत सर्व प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन उभारु असा इशारा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.