Pune News: हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच मिलिंद एकबोटे यांना अटक होणार ?

एमपीसी न्यूज: वादग्रस्त विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, कालीचरण महाराज यांच्यासह सहा जणांवर पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील कालीचरण महाराजाना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे.

दरम्यान याच गुन्ह्यात आरोपी असलेले मिलिंद एकबोटे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. परंतु त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अटक केली जाणार आहे अशी माहिती खडक पोलिसांनी दिली.

शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानात (दि.19 डिसेंबर) झालेल्या कार्यक्रमात वादग्रस्त भाषण केले गेले होते. याबाबत पोलीस अंमलदार सोमनाथ ढगे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे. त्यानुसार समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक नागपुरे, अकोल्याचे कालीचरण महाराज, नंदकिशोर एकबोटे आणि दिगेंद्रकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी कलम 295 (अ), 298 505(2), 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कालीचरण महाराज यांचा शोध घेत होते. त्यांना पकडण्यासाठी खडक पोलिसांचे एक पथक दोन दिवसांपूर्वरायपूरमध्ये गेले होते. त्यानुसार आज कालीचरण महाराज यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान ट्राझिट रिमांड घेऊन पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. काही तासात पथक पुण्यात दाखल होईल, असे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.