23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Pune News: राष्ट्रीय पुरस्कार विजेते नंदन बाळ, सुयश जाधव यांचा सन्मान

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज- फर्ग्युसनच्या टेनिस प्रशिक्षण केंद्रातून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते टेनिसपटू घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार विजेते खेळाडू नंदन बाळ यांनी दिली.

टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक नंदन बाळ (बीएमसीसी) आणि अर्जुन पुरस्कार विजेता विकलांग जलतरणपटू सुयश जाधव (फर्ग्युसन) या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) माजी विद्यार्थ्यांना अनुक्रमे ध्यानचंद जीवनगौरव आणि अर्जुन या राष्ट्रीय पुरस्कारांनी नुकतेच गौरविण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त सोसायटीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते.

बाळ पुढे म्हणाले, ‘बीएमसीसीत खेळाला प्रोत्साहन मिळाले. फर्ग्युसनमध्ये प्रशिक्षक म्हणून कारकिर्द बहरली. यासाठी डीईएसचे मोठे पाठबळ मिळाले. खेळातील यश मिळवत असताना परीक्षेच्या काळात स्वतःचा वेळ देऊन अभ्यास करून घेणार्‍या प्राध्यापकांचे योगदान महत्त्वाचे होते.’

सुयश जाधव म्हणाले, ‘अर्जुन पुरस्कार मिळविण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आता पुढील वर्षी ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या यशात फर्ग्युसनचा वाटा मोलाचा आहे.

निवास, भोजन, प्रवास आणि खेळासाठी आवश्यक असणारी मदत महाविद्यालयाने विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यामुळे मोठा हातभार लागला. सत्कारातून अधिक यश मिळविण्याची प्रेरणा मिळते.’

खेळ आणि त्याच्याशी संबंधित साहित्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी क्रीडा शिक्षकांची असते. मैदानावरील सरावासाठी मदत, खेळाडूंना प्रोत्साहन आणि नियोजनातून क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण यश मिळवता येते. असे मत डॉ. कुंटे यांनी व्यक्त केले.

बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांची भाषणे झाली. डॉ. सविता केळकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष महेश आठवले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. स्वप्निल देशमुख, गौतम सोनावणे यांनी परिचय करून दिला. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

पुस्तकाचे प्रकाशन
खो-खो या खेळावर संशोधन करून डॉ. मोहन अमृळे आणि डॉ. आनंद लुंकड यांनी लिहिलेल्या ‘खो-खो व पूरक खेळ’ या पुस्तकाचे डॉ. कुंटे यांच्या हस्ते या वेळी प्रकाशन करण्यात आले.

spot_img
Latest news
Related news