Pune News : आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धांतील राष्ट्रीय विजेत्यांचा संवाद

एमपीसी न्यूज – शहराचे वैभव ठरणाऱ्या ‘आयकॉनिक’ इमारती (Pune News) तयार होताना त्या मागे असणारी वास्तुरेखाकाराची दृष्टी, योगदान, कष्ट याची निर्माण कथा शुक्रवारी उलगडली.. निमित्त होते ‘सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज्’ संस्थेने आयोजित केलेल्या चर्चासत्राचे ..

सार्वजनिक उपयोजन असलेल्या महत्वपूर्ण सरकारी इमारतींना सुंदर रुपडे देताना काय करावे लागते, याचा रोचक प्रवास त्यातून उलगडला..! या स्पर्धा आर्किटेक्ट टीमला अद्ययावत ठेवते, त्यामुळे सहभाग घेत राहावे, हार -जीत न मानता नव्या गोष्टी शिकत राहावे, असा सूर या चर्चासत्रात उमटला.

‘सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज’ या संस्थेतर्फे ‘आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटिशन्स -पुशिंग द एज इन आर्किटेक्चर प्रोफेशन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. सुनील पाटील (संचालक सुनील पाटील अँड असोसिएट्स),कल्पक भंडारी( संचालक, विकास स्टुडिओ), विजय साने (पार्टनर, व्ही.के.: यु ,अर्बन) हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले. राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटिशन मधील विजेते असलेल्या या मान्यवरानी त्यांचे अनुभव आणि विचार या चर्चासत्रात मांडले.

23 जून रोजी सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृह येथे हे चर्चासत्र झाले. आर्किटेक्चरचे विद्यार्थी, आर्किटेक्ट व्यावसायिक, तसेच या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती या चर्चासत्रात सहभागी झाले. ‘अनबिल्ट’ या पुस्तकाची माहिती चर्चासत्रात देण्यात आली.

अतुल चव्हाण म्हणाले, ‘सामान्य जनतेच्या संबंधित सरकारी इमारती (Pune News)आल्हाददायक, उपयुक्त, पर्यावरणपूरक व्हाव्यात, चांगल्या वास्तू उभारण्यात आर्किटेक्ट समुदायाचे योगदान मिळावे.’

सातारा नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याची माहिती कल्पक भंडारी यांनी दिली. सुनील पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. विजय साने यांनी कटरा (जम्मू ) येथील इंटरमोडल स्टेशन इमारतीच्या आराखडयाचे सादरीकरण केले.

द्वैपायन चक्रवर्ति यांनी सूत्रसंचालन केले. अपूर्वा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी, ज्येष्ठ आर्किटेक्ट विकास भंडारी, ह्रषिकेश कुलकर्णी, आर्किटेक्ट असोसिएशनचे पराग लकडे, अमोल उंबरजे, विजय साने, विशाल देशमुख, दीपा बोकील आदी उपस्थित होते.

‘सस्टेनॅबिलिटी  इनिशिएटिव्हज’  ही संस्था आर्किटेक्चर क्षेत्रातील व्ही.के. ग्रुप या कंपनीचा  एक उपक्रम आहे. व्ही.के. ग्रुपच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गोल्डन डायलॉग ही चर्चासत्रांची मालिका आखण्यात आली असून हे चर्चासत्र या मालिकेतील तिसरे चर्चासत्र होते.

सुनील पाटील म्हणाले, ‘पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची उभारणी करताना शंभरहून अधिक झाडे वाचविणे हे आव्हान होते. नैसर्गिक उजेड, हवा खेळती राहील, कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना थांबायला जागा मिळेल, वाहनांना चांगली जागा मिळेल याचा विचार केला.

सरकारी यंत्रणेला आपण चांगल्या संकल्पना व्यवस्थित समजावून सांगितल्या तर त्या स्वीकारल्या जातात, असा अनुभव या प्रकल्पातून आला.  सरकारी काम करताना संयम ठेवावा लागतो. या दरम्यान अधिकारी बदलतात, सरकारे बदलतात, ब्रीफ बदलतात. पण, आपण आपल्या संकल्पनांवर ठाम राहावे लागते.

कारण, या इमारती दशकानुदशके समाजाकडून उपयोगात येतात. एक योगदान म्हणून आर्किटेक्ट मंडळींनी याकडे पाहावे. ‘

‘क्लायंट ब्रीफ देतात  तेव्हा त्यातील आशय लक्षात घ्यावा लागतो, दोन ओळींच्या मध्ये न लिहिलेला आशय समजून घेणे आवश्यक असते. कटराला रोज 50 हजार भाविक भेट देतात. त्यांना बस, रेल्वे, हेलिकॉप्टर, कार, रोपवे सहित राहण्याची सुविधा असणारा परिसर उभारायचा होता. 25 एकर जागेत जागतिक दर्जाच्या या सेंटरची उभारणी करण्यात यश आले ‘, असे विजय साने यांनी सांगितले.

Pune : चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसवेत घेतला ‘मिसळ’चा आस्वाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.