Pune News: बोगस डॉक्टरांसंदर्भात तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

एमपीसी न्यूज – शहरातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जाणार्‍या कारवाईला पोलीस खात्याकडून खो दिला जात आहे. बोगस डॉक्टरांच्या विरोधात तक्रार घेण्यास पोलीस ठाण्यांकडून महिनोन-महिने टाळाटाळ केली जाते, तसेच तक्रार दिल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

शहरात वैद्यकीय क्षेत्रातील बोगस पदव्या घेवून अनेकजण वैद्यकीय व्यवसाय करतात. योग्य शिक्षण नसतानाही रुग्णांना औषधे देवून उपचार केले जातात. अनेकवेळा चुकीच्या उपचारामुळे नागरिकांचा जिवाला धोका निर्माण होतो. अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांची संख्या दाट लोकवस्तीमध्ये व झोपडपट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने 2013 मध्ये बोगस डॉक्टर शोध समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त असून आरोग्य प्रमुख सचिव असतात. तर पोलीस, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, झोनल वैद्यकीय अधिकारी सदस्य आहे.

नवीन दवाखान्याची माहिती आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत मिळाल्यानंतर किंवा नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर महापालिकेचे वैद्यकीय झोनल अधिकारी संबंधित डॉक्टराची कागदपत्रे ताब्यात घेतात. त्यानंतर ती कागदपत्रे पालिकेच्या विधी विभागाकडून तपासले जातात. विधी विभागाने संबंधित डॉक्टरची कागदपत्रे किंवा पदव्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी योग्य नाहीत, असा अभिप्राय दिल्यानंतर त्या बोगस डॉक्टर विरोधात पोलिसात तक्रार दिली जाते.

मात्र, पोलीस तक्रार घेण्यात टाळाटाळ करतात. तसेच तक्रार घेतल्यानंतर संबंधीत बोगस डॉक्टरचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करत नाहीत, अशा तक्रारी आरोग्य विभागाकडून वरीष्ठांकडे करण्यात येत आहेत. वैद्यकीय झोनल अधिकारी बोगस डॉक्टरच्या विरोधात तक्रार देण्यास तक्रार घेण्यास टाळाटाळ करून त्यांना दिवस दिवस बसवून ठेवले जाते.

कोणत्या कलमाखाली तक्रार घ्यावी, याची माहिती नाही, यासंदर्भात शासनाच्या आदेशाची प्रत नाही, अशी कारणे पोलिसांकडून दिली जातात, अशा तक्रारी आहेत. परिणामी बोगस डॉक्टर दुसर्‍या ठिकाणी बस्तान बांधून आपला व्यावसाय पुन्हा थाटतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.