Pune News : तळजाई टेकडीवरील जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी

एमपीसी न्यूज – तळजाई टेकडीवरील ‘हिल टॉप हिल स्लोप’ वरील बहुचर्चित नियोजित ‘जैवविविधता उद्यान’ उभारण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी या आराखड्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.
या आराखड्यात सात उद्यानांचे सेंट्रल पार्क, जॉगिंग व सायकल ट्रॅक, हरित स्कूल, पक्षी निरीक्षण, खुले अॅम्पी थिएटर आदी सुविधा असणाऱ्या या उद्यानासाठी 120 कोटी खर्च येणार आहे.
हिल टॉप हिल स्लोपचे आरक्षण असलेली सुमारे शंभर एकर जमीन न्यायालयीन लढ्यानंतर महापालिकेच्या ताब्यात आली आहे. यापैकी बहुतांश जमिनीचे संपादन झाले असून अद्याप काही जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.
या जागेवर जैववैविध्य उद्यान उभारण्यासाठी स्थानिक ज्येष्ठ नगरसेवकांकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तसेच स्थानिक आमदारांनीही यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आयुक्तांसमोर आराखड्याच्या सादरीकरणादरम्यान माननीयांमध्ये एकमत न झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
या वेळी आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप, महेश वाबळे, आबा बागुल उपस्थित होते.
महापालिकेचे कामकाज सुरळीत झाल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी हा मास्टरप्लॅन मान्यतेसाठी स्थायीपुढे ठेवला असून त्यासाठी 120 कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाची व्याप्ती तसेच एका आर्थिक वर्षात एवढी तरतूद करता येणे शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प विकसित करण्यात येईल.
सेंट्रल पार्कमध्ये नक्षत्र उद्यान, मसाल्यांच्या झाडांचे उद्यान, सुवासिक उद्यान, बांबू उद्यान, फुलांचे उद्यान, जैविक वनस्पती उद्यान, रानमेवा उद्यानाचा समावेश असेल. पर्यावरणप्रेमींचा विरोध आणि स्थानिक नगरसेवकांमधील संघर्षामुळे मागील तीन वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाला येत्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.