Pune News- ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना “ब्राह्मण भूषण” पुरस्कार  जाहीर

एमपीसी न्यूज – आम्ही सारे ब्राह्मण पाक्षिक व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका मासिक या दोन्ही नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ब्राह्मण भूषण पुरस्कार स्वा. सावरकरांविषयी ज्वलंत अभिमान असणारे ज्येष्ठ अभिनेते  शरद पोंक्षे यांना आणि यावर्षीचा इंदुमती – वसंत करिअर भूषण पुरस्कार युवा लेखक, सिनेदिग्ग्दर्शक व प्रखर हिंदुत्ववादी दिग्पाल लांजेकर यांना देण्यात येणार आहे.  याप्रसंगी कॅप्टन निलेश गायकवाड (शिवसंघ प्रतिष्ठानचे संस्थापक) प्रमुख पाहुणे म्हणून तर शिरीष देशपांडे (मुख्य कार्यकारी अधिकारी,  बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी) अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मासिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी आज येथे दिली. मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्काराचे यंदाचे 8 वे वर्ष आहे. 

 

सदरच्या नियतकालिकांचा वर्धापनदिन समारंभ रविवार, दि. 8 मे रोजी सायं. 5.30 वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे येथे होत आहे. या कार्यक्रमात शरद पोंक्षे लिखित ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या 10 व्या आवृत्तीचे लोकार्पण होणार असून त्यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ घेणार आहेत.

मासिकाच्या वतीने यापूर्वी श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर (2013), अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष  गोविंद कुलकर्णी (2014), एअर मार्शल भूषण गोखले (2015), पं. वसंतराव गाडगीळ (2016), पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई (2017),  पौरोहित्यांचे संघटन करणार्या श्री सद्गुरु ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी (2018) व सुप्रसिद्ध प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे (2019) यांना ब्राह्मण भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

 

ब्राह्मण समाजाच्या उन्नतीकरिता आणि प्रगतीकरिता 2011 पासून आम्ही सारे ब्राह्मण हे पाक्षिक व 2005 पासून ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका हे मासिक सुरू झाले आहे. सुरुवातीपासूनच या दोन्ही नियतकालिकांना चांगला प्रतिसाद लाभला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.