Pune Crime News : दरोडा टाकून झाला होता फरार, दहा वर्षांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – दरोडा टाकून मागील दहा वर्षांपासून फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या दरोडा वाहनचोरी विरोधी पथकाने नऱ्हे येथील पारी कंपनी जवळ आरोपीला अटक केली आहे. राजू बाबुराव जावळकर (वय 55) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, राजू जावळकर याने अहमदनगर जिल्ह्यात 2011 साली दरोडा टाकला होता. याप्रकरणी अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात 2011 सालीच गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कोथरूड, वारजे – माळवाडी आणि सिंहगड रस्ता परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना आरोपी राजू जावळकर हा नऱ्हे परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कारवाईसाठी त्याला तोफखाना पोलीस स्टेशन च्या ताब्यात सोपवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.