Pune Crime News  : किरण गोसावीची सहकारी शेरबानो कुरेशी गजाआड

एमपीसी न्यूज – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने पकडल्यानंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावी यांची सहकारी शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) हिला पुणे पोलिसांनी अटक केली. मुंबईतुन तिला अटक करण्यात आली आहे.

यातील किरण गोसावी याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत चिन्मय देशमुख (वय २२) या तरूणाने २०१८ मध्ये पोलीसांकडे तक्रार दिलेली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, किरण गोसावी याने चिन्मय याला परदेशात नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून ३ लाख रुपये उकळले होते. हे पैसे शेरबानो हिच्या खात्यावर गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, सहाय्यक निरीक्षक अभिजीत पाटील, कर्मचारी सचिन सरपाले, तुषार खडके व त्यांच्या पथकाने शेरबानो हिला मुंबईवरून अटक केली आहे. तिच्याकडे चौकशी सुरू असून, तिला न्यायालयात हजर केले असता २३ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, यातील किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. किरण गोसावी याने आर्यन खानसोबत सेल्फी काढल्यानंतर तो चर्चेत आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केल्यानंतर किरण गोसावी वादात अडकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.