Rahul Bajaj Funeral : राहुल बजाज अनंतात विलीन; शासकीय इतमामाने अंत्यविधी

एमपीसी न्यूज – उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर रविवारी (दि. 13) पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागील काही दिवसांपूर्वी राहुल बजाज यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शनिवारी (दि. 12) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव बजाज कंपनीतील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

राहुल बजाज यांचं पार्थिव दुपारी पावणे पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमीत दाखल झाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्य सरकार वतीने पुष्पहार अर्पण केला. शहराचे महापौर मुरलीधर मोहळ यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त रवींद्र सिसवे,  रामदेव बाबा, अंकुश काकडे, मोहन जोशी, बाबा कल्याणी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबाचे सांत्वन केले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे, योगगुरु बाबा रामदेव, माजी आमदार विलास लांडे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, राजीव बजाज, अंकुश काकडे, मुलगी सुनैना केजरीवाल, संजीव बजाज, सून शेफाली बजाज, मोहन जोशी, बाबा कल्याणी, अभय छाजेड, बाबू वागस्कर तसेच अनेक मान्यवर नागरिक व कामगार वर्गातील नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, यासह सामाजिक, राजकीय, उद्योग, कामगार क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे दर्शन घेतले.
प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं काल पुण्यात निधन झालं, वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये काल दुपारी अडीच वाजता निधन झाल्यानंतर आज सकाळपर्यंत त्यांचं पार्थिव रुबी हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आलं होतं आणि आज सकाळी ठीक साडेआठच्या सुमारास त्यांचं पार्थिव त्यांच्या आकुर्डी येथील निवासस्थानी नेण्यात आलं होतं. आज सकाळी 11 वाजल्यापासून त्यांचं पार्थिव हे त्यांच्या आकुर्डी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अनेक मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.