IPL 2022 News : राजस्थान रॉयल्स बेंगलुरु 7 गडी राखून दणदणीत विजय

एमपीसी न्यूज : (विवेक दि. कुलकर्णी)बटलरच्या चौथ्या विक्रमी शतकाने राजस्थान रॉयल्सचा बंगलोरवर 7 गडी राखुन दणदणीत विजय.आता रविवारी गुजरात टायटन विरुद्ध विजेतेपदासाठी लढणार. अहमदाबाद येथे झालेल्या आजच्या दुसऱ्या कॉलीफायरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 7 गडी आणि 11 चेंडु राखुन दणदणीतरित्या पराभूत करत अंतिम सामन्यात शानदार प्रवेश केला आहे आणि या विजयासोबतच बंगलोरचाही या हंगामातला प्रवासही समाप्त केला आहे.

जोस बटलरने फक्त 60 चेंडूत नाबाद 106 धावा करताना 10 चौकार आणि सहा षटकार मारत बंगलोर संघाच्या गोलंदाजांना दे माय धरणीठाय करताना विराट कोहलीच्या एका मोसमात चार शतके पूर्ण करण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.

आतापर्यंत तीनदा अंतीम सामन्यात प्रवेश करुनही विजेतेपद न मिळू शकलेले रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध 2008 साली शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकलेले राजस्थान रॉयल्स या दोन संघात आजचा थोडक्यात नॉकआऊट मानला जावू शकणारा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला गेला, ज्यात राजस्थानने बंगलोर वर दणदणीत आणि रॉयल विजय मिळवून अंतीम फेरीही गाठली आहे.

अनिल कुंबळे,डॅनियल विट्टोरी आणि कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने अनुक्रमे 2009,2011 आणि 2016 झाली अंतीम फेरीत धडक मारली होती,मात्र तिन्ही वेळा त्यांना पराभवाचाच सामना करावा लागला होता,तो सर्व इतिहास पुसून काढण्यासाठी आणि नवा इतिहास रचण्यासाठी त्यांना आता फक्त दोन पण दमदार पाऊले टाकावी लागणार होते त्यातले पहिले पाऊल आज त्यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध टाकले.

खरे तर  राजस्थान विरुद्ध  त्यांचा इतिहास चांगला होता,मागील पाच सामन्यापैकी चार सामने बंगलोरने जिंकले होते,मात्र इतिहास वेगळा आणि वर्तमान वेगळा,20/20 मध्ये प्रत्येक सामना नवा असतो आणि ज्याचा दिवस चांगला तो विजय मिळवू शकतो याची जाणीव दोन्हीही संघाला असल्याने आजचा सामना दोन्ही संघासाठी करो वा मरो असाच होता.आजच्या या सामन्यात संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.आजच्या सामन्यात दोन्हीही संघाने आपल्या शेवटच्या सामन्यातलाच संघ कायम ठेवला.

आरसीबी संघाच्या डावाची सुरुवात कर्णधार डूप्लेसी आणि माजी कर्णधार विराट कोहली या जोडीने केली.तर राजस्थान रॉयल्स कडून ट्रेंट बोल्टने गोलंदाजीची सुरुवात केली.या षटकात कोहलीने एक जबरदस्त षटकार मारत सुरुवात तरी शानदार केली,पहिल्या षटकात 8 धावा निघाल्या.

ही सुरुवात बघता कोहली आज काही तरी तुफानी करणार असे वाटत असतानाच प्रसिद्ध कृष्णाने त्याला सॅमसनच्या हातुन झेलबाद करुन आपल्या संघाला पहिले आणि मोठे यश मिळवून दिले तर आरसीबीला मोठा धक्का दिला, यानंतर खेळायला आला तो मागच्या सामन्याचा मानकरी रजत पाटीदार याजोडीने पुढे खेळताना कोहलीच्या जाण्याने आलेल्या दडपणाला झुगारून देत चांगले खेळायला सुरुवात केली.

रजत पाटीदारचा आत्मविश्वास अतिशय बुलंद आहे,त्याने जणू मागील डावच पुढे चालू केल्यासारखे खेळायला सुरुवात केली, बघताबघता या जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगलेच सावरले सर्व काही छान चालले आहे असे वाटत असतानाच मकॉयने डूप्लेसीला वैयक्तिक 25 धावांवर अश्विनच्या हाती झेल द्यायला लावून ही 70 धावांची चांगली भागीदारी फोडली,

यावेळी आरसीबीची धावसंख्या होती 10.4 षटकात2 बाद 79 त्यानंतर पाटीदारला साथ द्यायला आला तो आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ग्लेन मॅक्सवेल त्याने आल्या आल्या आपल्या कीर्तीला साजेसा खेळ करायला सुरुवात केली,त्याने पहिल्या 5 चेंडूत 2 गगनभेदी षटकार मारले, त्यामुळे या जोडीने तेराव्या षटकातच संघाचे शतक पूर्ण केले.

ही जोडी खतरनाक ठरतेय असे वाटत असतानाच बोल्टने मॅक्सवेलची छोटी पण स्फोटक खेळी वैयक्तिक 24 धावांवर संपवून आरसीबीला तिसरा मोठा धक्का दिला,त्याने केवळ  13 चेंडूत 2 षटकार आणि एक चौकार मारत 24 धावा केल्या.

एक बाजूने विकेट्स पडत असल्या तरी पाटीदारने मात्र आपली एकाग्रता जराही भंग होवू दिली नाही आणि आपले दुसरे अर्धशतक पूर्ण करत एक आणखीन महत्वपूर्ण खेळी करुन आपले नाणे खणखणीतरित्या वाजवले,त्याने 41 चेंडूत 4 चौकार आणि तीन षटकार मारत हा मोठा टप्पा गाठला.तो आणखी एक चांगली खेळी करणार असे वाटत असतानाच अश्वीनने त्याला 58 धावांवर बाद करुन आपल्या संघाला मोठे यश मिळवून देतानाच आरसीबी संघाला फार मोठा हादरा दिला.

यावेळी आरसीबीची धावसंख्या 15.3 षटकात 4 बाद 130 अशी झाली होती.एकदम मजबूत परिस्थितीत असलेल्या आरसीबीची अवस्था मॅक्सवेल आणि पाटीदारच्या बाद होण्याने  अचानक नाजूक झाली, त्यातच भरोशाचा कार्तिकही आज एकदम स्वस्तात बाद झाला आणि  200च्या आसपास जाईल असे वाटणाऱ्या आरसीबीला आपल्या निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून फक्त 157 धावाच करता आल्या.राजस्थानच्या कृष्णा आणि मकॉयने अप्रतिम गोलंदाजी करत मोठया धावसंख्येकडे चाललेल्या आरसीबीला 157 धावात रोखून जबरदस्त कामगिरी केली.

उत्तरादाखल खेळताना राजस्थान रॉयल्सने पहिल्याच षटकात सिराजवर जबरदस्त हल्ला चढवून 16 धावा चोपत आक्रमक सुरुवात केली.युवा यशस्वी जैस्वालने 2 षटकार आणि एक चौकार मारत 16 धावा काढत सिराजला चांगलेच परेशान केले.तर दुसऱ्या षटकात जॉस बटलरने हेजलवूडच्या षटकात 6 धावा काढत राजस्थानला दोन षटकात नाबाद 22 धावांची चांगली सुरुवात करुन दिली.

याच धडाकेबाज कामगीरीला पुढे तसेच चालू ठेवत या जोडीने पहिल्या गड्यासाठी फक्त 31 चेंडूत 61 धावांची दणदणीत सलामी दिली.13 चेंडूत 21 धावा काढून बाद झाला,त्याच्या जागी आलेल्या कर्णधार संजूने बटलर सोबत दुसऱ्या गड्यासाठी  52 धावांची भागीदारी करत आरसीबीवर चांगलेच दडपण वाढवले,दरम्यान जॉस बटलरने या आपले या  स्पर्धेतले 5 वे अर्धशतक पूर्ण करत विजय सहजसोपा होईल याची काळजी घेत राजस्थान रॉयल्सची विजयाकडेही दमदार वाटचाल चालूच ठेवली ,संजू  आजही स्थिर झालाय असे वाटत असतानाच  23 धावा करून हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

पण तोपर्यंत राजस्थानचा अंतीम फेरीतल्या प्रवेशाचा मार्ग सोपा झाला होताच,आणि विजयाची फक्त औपचारिकताच बाकी होती, ती बटलरने धडाकेबाज अंदाजात या हंगामातले चौथे विक्रमी शतक  पुर्ण करत आपल्या संघाला दणदणीत  विजय मिळवून देतानाच एका हंगामात 800 हुन अधिक धावा काढण्याचा भीमपराक्रमही केला.त्याने या शतकाबरोबर एका हंगामात चार शतके करण्याच्या कोहलीच्या विक्रमाची बरोबरीही केली.त्यानेच विजयी षटकार मारत राजस्थानला अंतिम फेरीतले स्थान पक्के करुन दिले.बटलरलाच सामन्याच्या मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 8 बाद 157
  • डूप्लेसी 25,पाटीदार 58,मॅक्सवेल 24
  • बोल्ट 28/1,अश्विन 31/1,कृष्णा 22/3,मकॉय 23/3
  • पराभूत विरुद्ध
  • राजस्थान रॉयल्स
  • 18.1 षटकात 7 बाद 161
  • जैस्वाल 21,सॅमण 23, बटलर नाबाद 106
  • हेजलवूड 23/2, हसरंगा 26/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.