Pune News : गर्ल्स लीडर्सच्या प्रयत्नाने खेड तालुक्यातील 12 गावातील वापरात नसलेल्या डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड मशीन पुन्हा वापरात

एमपीसी न्यूज : 28 मे हा दिवस जगभरामध्ये मासिकपाळी आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गर्ल्स लीडर्सच्या प्रयत्नाने खेड तालुक्यातील 12 गावातील वापरात नसलेल्या डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड मशीन पुन्हा वापरात आणण्यात आल्या आहेत. 

या बाबत माहिती देताना संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास म्हणाल्या, मासिकपाळी या विषयाकडे लक्ष वळविणे, त्यावर मोजण्या योग्य कृती करणे आणि या विषयावर काही गुंतवणूक करणे मग ती आर्थिक असेल किंवा विचारांची असू शकते. या विषयात भारता सारख्या विकसनशील देशाच्या पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्य़ाची स्थिती गेल्या दोन वर्षापासून किशोरवयीन मुली पोटतिडकीने मांडत 2019-20 साली वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्थेने खेड तालुक्यातील 15 माध्यमिक शाळांमधील 1000 मुलींसोबत  मासिकपाळी व्यवस्थापन आढावा घेतला असता.

असे दिसले कि, 79% मुली पॅड वापरतात पण केवळ 5 % शाळांमध्येच पॅड मिळते ज्याची गुणवत्ता मुलींच्या सांगण्यावरून चांगली नाही. 74% मुली शाळेच्या वेळेत एकदाही पॅड बदलत नाहीत कारण शाळेत वेगळी सुरक्षीत जागा नाही, पॅड शाळेत मिळत नाही, मुबलक पाणी नाही,  95% शाळांमध्ये मासिक पाळीसाठी व्यवस्था नसल्यामुळे मुलींना त्या दिवसांमध्ये  घरी जावे लागते.

यावर आवाज उठविण्यासाठी मुलींनी एकत्रित येऊन शाळेतील मुख्यध्यापकांसोबत चर्चा केली, एवढेच नाही तर मुलींचे अधिवेशन भरवले आणि आपले गाऱ्हाणे संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडले पण माध्यमिक शाळा आमच्या अखत्यारीत येत नाहीत असे सांगून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आम्ही काहीतरी करू शकतो व करू असे आश्वासन दिले गेले.

आणि या स्वरूपाचा एक अध्यादेश सुद्धा खेड पंचायत समितीने काढला होता ज्यामध्ये शाळां मधील मासिक पाळी व्यवस्थापनाची स्थिती सुधारावी म्हणुन सर्व ग्रामपंचायतीना सुचना दिल्या होत्या. या परिस्थितीला दोन वर्ष झाले तरी स्थानिक पातळीला किंचितही या मुद्यावर हालचाल झालेली दिसत नाही.

२०१९ साली जिल्हापरिषदेकडून सर्व ग्रामपंचायतींना  disposable मशीन (पॅड जाळण्याची मशीन ) देण्यात आली आहे. त्याचा देखील आढावा मुलींनी घेतला असता. एकतर या मशीन आशा वर्कर च्या घरी आहेत, काही ठिकाणी त्या अंगणवाडीत लागलेल्या आहेत तर काही ठिकाणी त्या ग्रामपंचायतीत लावलेल्या आहेत.

एकवेळेला या सॅनेटरी पॅड वेन्डिंग मशीन असत्या आणि त्या अशा ठिकाणी लावल्या असत्या तरी समजून घेता आले असते कि, महिला , मुली तिथे जाऊन पॅड विकत घेतील पण सॅनेटरी पॅड जाळण्याच्या मशीन ग्रामपंचायत, आशा वर्करचे घर, अंगणवाडी अशा ठिकाणी लावल्यावर त्याचा उपयोग कोण करू शकेल का ? याचा साधा विचार स्थानिक प्रशासनाने केलेला दिसत नाही. यावरून मासिक पाळी विषयात अजून खूप काम करण्याची आणि सगळ्यात आधी एकंदरीतच समाजाचा  या विषयाकडे बघण्याचा नाकारात्मक दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे

28 मे मासिक पाळी आरोग्य दिनाच्या निमित्ताने संस्थेशी संबंधीत गर्ल्स लीडर्स ने या मशीन योग्य ठिकणी  म्हणजेच शाळांमध्ये, वस्त्यांमध्ये हलविण्याचे काम हातात घेतले आहे आणि सोबतच त्यांचा मागण्यांचा मसुदा ज्यात शाळेत हँडवॉश, वेन्डिंग मशीन, disposable मशीन, डिग्निटी रूम पाहिजे या मागण्यांसाठी  पुन्हा एकदा जोर धरला आहे.

हि स्थिती काही एकट्या तालुक्याची नाही तर संपूर्ण जिल्ह्याची, राज्याची आणि देशाची आहे. हि आकडेवारी पाहिल्यावर आता तरी प्रशाशनाला जाग येईल अशी आशा आहे. या कामात मुलींना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संस्थेचे कार्यकर्ते श्रद्धा तेलंग,सूरज कांबळे, प्रियांका नाइकडे, रोहिणी कोरडे  असे कार्यकर्ते करत आहेत, अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.