IPL 2021: राजस्थानचा चेन्नईवर “रॉयल’ विजय, ऋतुराजचे पहिले शतक ठरले व्यर्थ!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – सकाळच्या सत्रातला पहिला सामना कमी धावसंख्येचा आणि रंगतदार झालेला ज्या क्रिकेटवेड्या रसिकांनी पाहिला त्यांना अगदी थोड्याच वेळात दुसरा मोठा पण काहीसा एकतर्फी झालेला सामना बघायला मिळाला. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई संघांच्या 189 धावांचा यशस्वी पाठलाग करून तब्बल सात गडी राखून मजबूत चेन्नई संघाला पराभवाचा धक्का देत आपल्या प्ले ऑफच्या आशाही पल्लवित केल्या.

चेन्नईने ऋतुराजच्या शतकी खेळीमुळे उभे केलेले 190 धावांचे मोठे आव्हान सुद्धा शिवम दुबे आणि सलामीवर जैस्वालच्या यशस्वी खेळीने मामुली ठरवत क्रिकेट किती अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे हे पुन्हा सिद्ध केले. अर्थात चेन्नई संघ आधीच प्ले ऑफ साठी पात्र ठरलेला असल्याने त्यांना या पराभवाने फारसा फरक पडणार नसला तरी राजस्थान रॉयल्स मात्र या विजयाने अजूनही प्ले ऑफ साठी पात्र ठरू शकतो ही शक्यता बळावली आहे.

अबू धाबीच्या शेख झाईद मैदानावर झालेल्या आयपीएलच 2021चा आजचा हा 47 वा सामना होता. ज्यात संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली.

चेन्नई संघाची ताकत त्यांची फलंदाजी आहेत हे माहीत असूनही राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. याचा बरोबर फायदा उठवत चेन्नई संघाने या स्पर्धेतल्या यावर्षीच्या हंगामातल्या सर्वोच्च  धावा रचून इतिहास रचला. आणि याचसोबत मूळच्या पुणेकर त्यातही पिंपरी-चिंचवडकर असलेल्या ऋतुराजने आयपीलमधले पहिले नाबाद शतकही झळकावले.

तुफान फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाड आणि डूप्लेसीने नेहमीसारख्याच झंझावाताने सलामीला सात षटकातच 47 धावा जोडल्या, अन डूप्लेसी वैयक्तिक 25 धावा करून संजू सॅमसनद्वारे राहुल तेवतीयाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यानंतर आलेल्या रैनाने जेमतेम काही चेंडूच मैदानावर तग धरला आणि तो सुद्धा केवळ 3 धावा करून तेवतीयाचीच शिकार झाला.

दोन बाद 57 अशी धावसंख्या असताना मोईन अली खेळायला आला आणि त्याने ऋतुराजला उत्तम साथ देत संघाची स्थिती सावरण्याचे मोठे कामही केले. या दोघांनी 57 धावांची भागीदारी केल्यानंतर मोईन अली वैयक्तिक 21 धावा झाल्यावर पुन्हा एकदा तेवतीयाच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अंबाती रायडू सुध्दा साकरीयाच्या गोलंदाजीवर स्वस्तात बाद झाला.

तेंव्हा चेन्नईच्या 16 षटकांत चार गड्याच्या मोबदल्यात 134च धावा झाल्या होत्या. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आज चेन्नईला 160च्या आत रोखून धरेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना वाटत होती, पण ऋतुराजच्या मनात मात्र काहीतरी वेगळे आणि तुफानी करून दाखवायचे होते. त्याने जडेजाच्या साथीने उरलेल्या षटकात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजावर तुफानी हल्ला चढवून  त्राही माम केले.

या दोघांनी उरलेल्या 22 चेंडूत 55 धावा कुटल्या. जडेजाने 15 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन ऋतुराज गायकवाड 95 वर पोहचला, त्यानंतर जडेजाने एक षटकार आणि एक चौकार मारत ऋतुराजला स्ट्रॉईक पासून दूर ठेवल्याने ऋतुराजला शेवटच्या चेंडूवर शतक गाठण्यासाठी 5 धावा हव्या होत्या, पण या पुणेरी वाघाने शेवटच्या चेंडूवर 108 मीटरचा गगनचुंबी षटकार मारत आपल्या पहिल्या आयपीएल शतकाला गवसणी घातली आणि याचंसोबत आपल्या संघाला या वर्षीच्या सर्वोच्च धावसंख्याही गाठून दिली.त्याने केवळ 60 चेंडूंत नाबाद 101 धावा चोपताना 9 चौकार आणि पाच उत्तुंग षटकार मारले.

याचसोबत त्याने के एल राहुलला मागे टाकत आतापर्यंत 508 सर्वोच्च धावा करत ऑरेंज कॅप ही पटकावली. राजस्थान कडून तेवतीयाने 39 धावा देत तीन गडी बाद केले.

एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने सुद्धा रॉयल सुरुवात केली. युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि एविन लेविसने चेन्नईच्या जागतिक गोलंदाजावर तुफानी हल्ला चढवला.19 वर्षीय युवा यशस्वी जैस्वालचा आजचा आवेश बघण्यासम होता. त्याने चौफेर हल्ला करत विस्फोटक फलंदाजी केली. त्याच्या मुळेच राजस्थान रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा ठोकल्या.

सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लेविस शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. तेव्हा राजस्थानच्या 77 धावा तर लेविसच्या 27, ज्या त्याने केवळ 12 चेंडूत चोपल्या होत्या, ज्यात दोन चौकार आणि दोन षटकार होते, ही जमलेली जोडी फोडून शार्दुलने आपल्याला का लकी गोलंदाज म्हणतात, हेच सिद्ध केले. दुसऱ्या बाजूने यशस्वी तुफानी खेळत होता. त्याला साथ देण्यासाठी कर्णधार संजू आला होता.

यादरम्यान यशस्वीने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्यासाठी त्याने केवळ 20 चेंडू घेतले होते. अर्धशतक केल्यावर मात्र यशस्वीच्या खेळीला नजर लागली. अन तो महेंद्रसिंग धोनीच्या हातात झेल देऊन आसिफचा बळी ठरला. यशस्वीने सहा चौकार आणि तीन षटकार मारत आपली अर्धशतकी खेळी सजवली. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने आज सर्वांना प्रभावित करून भारतीय युवा पिढी किती प्रतिभावंत आहे याची सुखद अनुभूतीही दिली.

त्यानंतर खेळायला आला तो शिवम दुबे, ज्याच्यात मोठमोठ्या क्रिकेटपटूना युवराजची झलक दिसते. त्याने भारतासाठी बारा 20/20 आंतरराष्ट्रीय सामने सुद्धा खेळले आहेत, पण कामगिरीत म्हणावे तसे सातत्य नसल्याने त्याला युवीचा वारसदार असल्याचे अजूनतरी सिद्ध करता आले नाही. कदाचित याच सातत्यहीन कामगिरीने त्याला राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेत आजपर्यंत अंतिम 11 मध्ये घेतले नव्हते.आज त्याला ती संधी मिळाली अन त्याने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आणि असा उचलला की ज्याचे नाव ते!

आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठोकताना त्याने अतिशय देखणी फलंदाजी केली. त्याची फलंदाजी इतकी सुंदर होत होती की तो कधी खेळायला आला आणि कर्णधार संजूला मागे टाकून कधी 50 धावा पूर्ण केल्या हे ही समजले नाही. त्याने बघताबघता आपले तुफानी अर्धशतक पूर्ण केले तेंव्हा संजू केवळ 28 धावांवर होता तर त्याच्यानंतर आलेल्या शिवम दुबेनी चार चौकार आणि चार देखणे उत्तुंग षटकार मारत आपला दर्जा आणि उपयुक्तता सिद्ध केली.

या अफलातून खेळीने राजस्थान रॉयल्स कधी विजयासमीप आले ते धोनीच्या लक्षात येईपर्यंत सामना त्याच्या हातातून सुटला होता. या दोघांनी 89 धावांची भागीदारी केल्यानंतर पुन्हा एकदा ठाकूरने विकेट मिळवली. त्याने सॅमसनला बाद करून चेन्नईच्या आशा वाढवल्या खऱ्या पण तोपर्यंत विजयाचे पारडे राजस्थानच्या बाजूला झुकले होते.

उरलेली विजयाची औपचारिकता आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या ग्लेन फिलिप्स आणि  आजच्या विजयाचा मुख्य शिलेदार शिवम दुबेने पूर्ण करत राजस्थनला चेन्नईवर रॉयल विजय मिळवून दिला. या सामन्यात अनेक जबरी खेळी झाल्या असल्या तरी आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण करणारा ऋतुराज गायकवाड सामन्याचा मानकरी ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.