Pune News: दोन महिन्यांत हटविणार रामटेकडी येथील 40 हजार टन कचरा

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाच्या जागेवर सुमारे दोन वर्षांपासून एक लाख मेट्रिक टन कचरा साचला होता. त्यापैकी 60 हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात पालिकेला यश आले आहे, तर उर्वरित 40 हजार मेट्रिक टन कचरा येत्या दोन महिन्यांत हटविला जाणार आहे.

शहरात रोज सुमारे 2200 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यातील सुमारे 800 टन कचरा जागेवर किंवा बायोगॅस प्रकल्पांवर जिरवला जातो. पण, सुका कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर नेऊन तो नष्ट केला जातो. पण, प्रकल्पाची क्षमता नसल्याने रोज 350 टन कचरा शिल्लक राहता होता, तो फुरसुंगी येथील कचरा डेपो येथे नेऊन डंपिंग केला जात होता.

पालिकेकडून डंपिंगचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. त्यामुळे कचरा रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाच्या जागेवर टाकण्यात आला. याविरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने महापालिकेने हा कचरा हटविण्यासाठी महापालिकेने निविदा काढून आदर्श भारत, सुमन नव्हायरो, नलगे व जीपीएडी या चार ठेकेदारांना काम दिले आहे. त्यांना कचऱ्याची वाहतूक करणे व प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे यासाठी प्रतिटन 875 रुपये मोबदला दिला जात आहे.

यातील नलगे या ठेकेदार कंपनीने 600 टन कचरा उचलल्यानंतर काम बंद केले आहे, तर उर्वरित तीन कंपन्यांकडून सध्या काम सुरू आहे. या ठिकाणी 75 हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी निविदा काढली होती. पण, निविदा मंजूर होण्यास वेळ लागल्याने या ठिकाणी आणखी 25 हजार मेट्रिक टन कचरा पडला आहे.

रामटेकडी येथे एक लाख मेट्रिक टन कचऱ्यापैकी 60 हजार मेट्रिक टन कचरा उचलला आहे. उर्वरित 40 हजार टन कचरा पुढील दोन महिन्यांत हटविला जाणार आहे, असे घनकचरा विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.