Ravet: स्मशानभूमीचे काम 60 टक्के पूर्ण, नंतर स्थगिती अन् आता पुन्हा फेरविचार

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा अजब कारभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत येथील सेक्टर नंबर 32 येथे बांधण्यात येत असलेल्या स्मशानभूमीचे काम 60 टक्के पूर्ण झाले असताना नागरिकांचा विरोध झाल्याने आयुक्तांनी कामाला स्थगिती दिली. आता काही नागरिकांनी स्मशानभूमीची मागणी केल्याने आयुक्त पुन्हा त्याबाबत फेरविचार करणार आहेत. त्यामुळे धरसोड निर्णय घेणारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.

महापालिकेने एक वर्षापूर्वी रावेत येथील सेक्टर नंबर 32 येथील जागेत स्मशानभुमीचे आरक्षण टाकले होते. त्यानुसार स्मशानभूमीच्या बांधकामास सुरूवातही करण्यात आली. त्याचे 60 टक्के काम देखील पूर्ण झाले आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांनी स्मशानभूमीला विरोध केला. सातत्याने आंदोलने केली. ही स्मशानभूमी झाल्यास वाऱ्याच्या दिशेनुसार स्मशानभूमीतून निघणारा धूर थेट या नागरिकांच्या घराकडे येईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी कारणे देत स्थानिकांनी या स्मशानभूमीला विरोध केला होता. परंतु, काम सुरुच होते.

30 डिसेंबर 2019 रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात प्रभाग क्रमांक 16 आणि 17 मधील सर्वपक्षीय नगरसेवकांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत आयुक्तांनी काम थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज पुन्हा प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी नगरसेवकांसह आयुक्तांची भेट घेतली. स्मशानभूमी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी या नागरिकांनी केली. त्यावर आयुक्तांनी सर्वांना बोलवून चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. 60 टक्के काम पूर्ण झाल्यावर स्थगिती देणे आणि पुन्हा फेरविचार करण्याच्या आयुक्तांच्या धरसोड निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”रावेत येथील स्मशानभूमीचे काम 60 टक्के पुर्ण झाले आहे. परंतु, काही नागरिकांचा त्याला विरोध होता. 30 डिसेंबर रोजी 2019 दोन्ही प्रभागातील नगरसेवकांसोबत बैठक झाली. नागरिकांच्या मागणीचा विचार करुन तात्पुरती कामाला स्थगिती दिली होती. स्मशानभूमीला पर्यायी जागा शोधण्यात येणार होती. परंतु, आज पुन्हा काही नागरिकांनी स्मशानभूमी करण्याची मागणी केली.

स्मशानभूमी रद्द करण्याला त्यांनी विरोध नोंदविला आहे. त्यामुळे पुन्हा सर्वांना बोलवून निर्णय घेतला जाईल. 60 टक्के काम पूर्ण झाले असले. तरी, लोकशाही आहे. त्यामुळे निर्णय बदलावा लागतो. स्मशानभूमीचे काम उद्यानासारखेच आहे. भितींपर्यंतचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे स्मशानभूमीला पर्यायी जागा मिळाल्यास आताच्या स्मशानभूमीच्या कामात बदल करुन उद्यान केले जाऊ शकते”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.