Pimpri News : आरटीपीसीआर कोरोना चाचणी पोटी 64 लाख रुपये देणार

एमपीसी न्यूज – महापालिकेने शहरातील खासगी प्रयोगशाळांना प्रति आरटीपीसीआर चाचणी करिता 580 रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार, तीन प्रयोगशाळांना एका महिन्यात 11 हजार 98  नमुने तपासणी पोटी 64 लाख 37 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानंतर जास्तीत जास्त लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील चार खासगी प्रयोगशाळांकडून आरटीपीसीआर कोरोना चाचणी करून घेण्याचे ठरविण्यात आले.

त्यानुसार, 16 मार्च 2021 पासून संबंधित प्रयोगशाळांना कामकाज आदेश देण्यात आले. त्यांना नेमून दिलेल्या रुग्णालयातून नमुना घेऊन जाऊन त्याची तपासणी करून अहवाल 12 ते 24  तासांत महापालिकेस दिला जातो.

प्रतिआरटीपीसीआर चाचणीकरिता 580 रुपये दर ठरविण्यात आला आहे. त्यानुसार, लाइफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड, मेटोपोलीस लॅब, पुणे, डॉ. लाल पॅथ लॅब्स लिमिटेड, क्रीष्णा डायग्नास्टिक्स या चार प्रयोगशाळांमार्फत आरटीपीसीआर चाचणीचे कामकाज केले जात आहे. या चारही प्रयोगशाळांनी आरटीपीसीआर चाचणी तपासणीची बिले मध्यवर्ती साहित्य भांडार विभागाकडे सादर केली आहेत.

लाइफनिटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड यांनी महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयातून 6 हजार 29 नमुने तपासणीपोटी 580 रुपये प्रतिचाचणी प्रमाणे 34 लाख 96 हजार रुपये बिल सादर केले आहे.

मेटोपोलीस लॅब यांनी यमुनानगर आणि आकुर्डी रुग्णालयातून 4 हजार 285 नमुने तपासणीपोटी 24 लाख 85  हजार रुपये, तर डॉ. लाल पॅथ लॅब्स लिमिटेड यांनी सांगवी आणि थेरगाव रुग्णालयातून 785 नमुने तपासणीपोटी 4 लाख 55  हजार रुपये बिल सादर केले आहे. त्यानुसार, तीन प्रयोगशाळांना आरटीपीसीआर चाचणीअंतर्गत 11 हजार 98  नमुने तपासणीपोटी 64  लाख 37 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.