Sangvi: अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करा, रस्त्याची कामे, मोकाट श्वान, डुक्करांचा बंदोबस्त करा; महापौर उषा ढोरे यांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – नवी सांगवी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. रस्ते व विविध विकासकामे नियोजनबद्ध रितीने मार्गी लावावीत. प्रभागातील मोकाट श्वान (कुत्री), डुक्करे पकडवावी. धोकादायक वृक्षांबाबत तातडीने कार्यवाही करावी. नव्याने विकसित होणा-या रस्त्यावर पथदिवे लावावेत, अशा सूचना महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी दिल्या. तसेच नदीपात्रातील जलपर्णीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून जलपर्णी तातडीने काढण्यास देखील त्यांनी सांगितले.

महापौरांनी प्रभाग क्रमांक 32 नवी सांगवी परिसरातील विविध विकासकामांबाबतची आढावा बैठक घेतली.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका शारदा सोनवणे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, श्रीकांत सवणे, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, रामदास तांबे, उपअभियंता हेमंत देसाई, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, अण्णा बोदडे, क्रीडा अधिकारी रझ्झाक पानसरे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यकारी अभियंता संजय खाबडे, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे आदी उपस्थित होते.

प्रभागातील रस्त्यांच्या भूसंपादनाचे विषय तातडीने मार्गी लावून जागा ताब्यात घ्यावी. विविध रस्त्यांच्या विकासासाठी भूसंपादन करून मोजणी करावी. रस्ते विकसित करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. अशा सूचना महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी दिल्या. तर त्यावर तातडीने नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिल्या.

नदीपात्रातील अनधिकृत झोपडपट्टीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका शारदा सोनवणे यांनी केली. पर्यावरण विभागाने अद्यापपर्यंत याबाबतची कोणतीही दखल घेवून कारवाई का केली नाही? अशी विचारणाही त्यांनी केली. याबाबत अनधिकृत बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबधित अधिका-यांना दिल्या.

प्रभागातील मैदान विकसित करणे व कलम 205 अंतर्गत विविध रस्त्यांच्या जागा ताब्यात घेण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. ज्या परिसरात अनियमित व दुषित पाणीपुरवठा आहे. त्याबाबत पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही महापौर ढोरे यांनी दिल्या. सांगवी परिसरातील अनधिकृत नळजोडणीबाबत पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र मोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.