Kondhva Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, परप्रांतीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर मेसेज पाठवून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचा लैंगिक छळ करणाऱ्या परप्रांतीय तरुणाविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे.  त्यानुसार धीरज शर्मा (वय 19, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्या मोबाईलवर मेसेज करून तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करणार आहे असे आमिष दाखवले. आणि तिला तिचे विवस्त्र फोटो पाठवण्यास भाग पाडले. नंतर हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तिचा वारंवार लैंगिक छळ केला.

दरम्यान पीडित मुलीने घडत असलेला सारा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कलम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.